संघर्ष समितीने मोजणीचे काम पाडले बंद!
By Admin | Updated: April 6, 2017 00:17 IST2017-04-06T00:17:45+5:302017-04-06T00:17:45+5:30
मेहकर : समृद्धी महामार्गाविषयी शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून, नवीन मूल्यांकनानुसार मोबदला मिळत नसल्याने संघर्ष समितीच्यावतीने महामार्गाच्या मोजणीचे काम बंद पाडले.

संघर्ष समितीने मोजणीचे काम पाडले बंद!
समृद्धी महामार्गाविषयी शासनाने दिशाभूल केल्याचा आरोप
मेहकर : नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गात शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी जात आहेत; मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
समृद्धी महामार्गाविषयी शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसून शेतकऱ्यांची शासनाकडून एकप्रकारे दिशाभूल होत असून, नवीन मूल्यांकनानुसार मोबदला मिळत नसल्याने संघर्ष समितीच्यावतीने नितीन पिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फर्दापूर येथे ५ एप्रिल रोजी समृद्धी महामार्गाच्या मोजणीचे काम बंद पाडले असून, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत मोजणी सुरु करु देणार नाही, असा तीव्र इशारा नितीन पिसे यांनी यावेळी दिला.
बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास ८२ किलोमीटरचा हा महामार्ग जात आहे. दोन महिन्यांपासून संयुक्त मोजणीचे काम लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथे सुरु होते. त्यावेळी आठ दिवसांमध्ये मूल्यांकन देऊ, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते, तर रेडिरेकनरच्या दरामध्ये २५ टक्के वाढ करुन मोबदला जास्त देण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत मोबदला मिळालेला नाही, तर संबंधित शेतकऱ्यांना कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत, तर फर्दापूर येथे ९०० मीटरच्या संयुक्त मोजणीचे काम ५ एप्रिलला सुरु करण्यात आले असता, संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन पिसे व जवळपास १०० ते २०० शेतकऱ्यांनी सदर काम अडविले. अशावेळी मोजणी अधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला पाचारण केले. यावेळी पोलीस व संघर्ष समितीचे सदस्य यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. तर जमिनी महामार्गात जात आहेत, त्या जमिनीचा पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. शेतकरी रस्त्यावर येऊन देशोधडीला लागत आहेत. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता संबंधित अधिकारी पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नितीन पिसे यांनी केला आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत मोजणी करु देणार नाही, असा खणखणीत इशारा नितीन पिसे यांनी यावेळी दिला. यावेळी संयुक्त मोजणी पथकाचे भू-मापन अधिकारी मांडवे, रस्ते विकास मंडळाचे लांडे, कृषी सहायक कंकाळ, तलाठी पंढरे, तसेच फर्दापूर येथील दामुअण्णा गाडेकर, संदीप गाडेकर, संघर्ष समितीचे नितीन पिसे, संदीप पिसे, परमेश्वर पिसे, नारायण देशमुख, संतोष टेकाळे, डिगांबर मुंढे, नारायण दांदडे, समाधान सुरुशे, नितीन देशमुख, पांडुरंग गायकवाड, गजानन सरोदे व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)