चिखलीत कावीळची साथ
By Admin | Updated: July 26, 2014 22:48 IST2014-07-26T22:48:24+5:302014-07-26T22:48:24+5:30
जलशुद्धीकरण केंद्रावरील बंद असलेल्या सेटलिंग टँकमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे

चिखलीत कावीळची साथ
चिखली : शहराला पाणीपुरवठा करणार्या जलशुद्धीकरण केंद्रावरील बंद असलेल्या सेटलिंग टँकमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे; तसेच बदलत्या हवामानामुळे शहरात सर्वत्र कावीळची साथ पसरली असून, शहरातील सुमारे २५0 नागरिकांना याची लागण झाली आहे. कावीळच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशुद्ध पाणी आणि बदलत्या हवामानामुळे चिखली शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सुमारे २५0 नागरिकांना कावीळची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले असून, इतरही साथरोगांनी रुग्णालये खच्चून भरली आहेत. शहराला नळयोजनेद्वारे होणार्या दूषित पाणीपुरवठय़ामुळे कावीळच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथील डॉ.तायडे यांच्या रुग्णालयात गत ४ ते ५ दिवसांत १४0 कावीळची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केल्याचे डॉ.तायडे यांनी सांगितले. यातील ४0 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तर दळवी हॉस्पिटलमध्ये १५ रुग्ण सद्यस्थिती दाखल असून, २५ रुग्णांवर उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे. डॉ.सुहास खेडेकर यांच्या रुग्णालयात २0 रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर डॉ.पानगोळे यांच्या रूग्णालयात ४५ कवीळचे रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती उपरोक्त डॉक्टरांनी दिली आहे. असे सुमारे २५0 पेक्षा अधिक नागरिकांना कावीळची लागण झाली असून, यामुळे सर्वत्र घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली शहराला पेनटाकळी प्रकल्पातून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. जवळपास एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या शहराचा जलशुद्धीकरण केंद्रावरील सेटलिंग टँक गत सात वर्षांपासून संपूर्णत: निकामी झालेला आहे. त्यामुळे पेनटाकळी प्रकल्पातून जलशुद्धीकरण केंद्रावर आणण्यात आलेले पाणी कोणत्याही प्रकारची शुद्धतेची प्रक्रिया न होता जसेच्या तसे नळयोजनेद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते, त्यामुळे जलजन्य आजारांची लागण होत असून, या अशुद्ध पाण्यामुळेच कावीळची लागण झाली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष शोभाताई सवडतकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांनी शहराला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावरील सेटलिंग टँकची तातडीने व प्राधान्याने दुरुस्ती करावी, जेणेकरून शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यामध्ये विविध आजार तोंड वर काढत असतात. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात या साथ रोगापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवून पिण्याचे पाणी उकळून घेणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.