३९ हजार कापूस बियाणे नमुन्यांची तपासणी !
By Admin | Updated: January 7, 2016 02:32 IST2016-01-07T02:32:37+5:302016-01-07T02:32:37+5:30
वर्षभरात सात हजार बियाणे ठरले अप्रमाणित.

३९ हजार कापूस बियाणे नमुन्यांची तपासणी !
नीलेश शहाकार/बुलडाणा : गत वर्षात राज्यभरात ३९ हजार ७८२ कापूस बियाणे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार ४0 नमुने अप्रमाणित ठरविण्यात आले. ही तपासणी कृषी विभागाच्या विविध ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली.
पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकरी कापूस बियाणे बाजारातून खरेदी करतात. कोणत्याही पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी संकरित, सुधारित जातींची लागवड करावी लागते, तसेच पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे शुद्ध व दज्रेदार असावे लागते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत कापूस बियाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. बरेचदा मागील हंगामातील बियाणे राखून ठेवली जातात. अशा बियाणांची पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक असते. पुणे, परभणी व नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत यावर्षी ४१ हजार ४७१ कापूस बियाणे नमुने प्राप्त झाले. यापैकी ३९ हजार ७८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. विविध परीक्षणाअंती त्यापैकी ७ हजार ४0 नमुने अप्रमाणित ठरविण्यात आले.
२0१५ मध्ये सर्वाधिक बियाणे अप्रमाणित
बियाण्यांचा काळाबाजार व दूषित बियाण्यांमुळे शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. गत पाच वर्षांत २0१५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १७.७0 टक्के कापूस बियाणे नमुने अप्रमाणित ठरविण्यात आले. २0११ मध्ये हे प्रमाण १४.६५ टक्के एवढे होते. २0१२ मध्ये ९.९६ टक्के, २0१३ मध्ये ८.९१ टक्के, तर २0१४ मध्ये १२.८४ टक्के कापूस बियाणे अप्रमाणित ठरविण्यात आले होते.
गुणवत्ता तपासणी आवश्यक
बी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १६६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८६ च्या अंमलबाजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर आवश्यक ठरवलेली आहे. त्यासाठी संबधित कायद्यांतर्गत प्रयोगशाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत. येथे वर्षभर विविध बियाण्यांची तपासणी प्रक्रिया सुरू असते.