सुलतानपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यन्वित असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडाळाच्या (मविम) वतीने राबविण्यात आलेल्या याेजनांची चाैकशी करून, दाेषींवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास, ६ जुलैपासून बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ बुलडाणांतर्गत सन २०१७ ते २०२१ दरम्यान मंजूर लाभार्थी महिला बचत गटांच्या योजनेचा लाभ कागदाेपत्रीच देण्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे, तसेच योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या किमतीची सत्यता पडताळणी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. वेणी (ता.लोणार) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महिला बचतगटाला मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत २०२०-२१ मध्ये मविम बुलडाणामार्फत वाटप करण्यात आलेल्या कृषी अवजार बँक याेजनेचा लाभ या गटास न देता, दुसऱ्याच गटास देण्यात आला. याप्रकरणी लाभार्थी महिलांनी चौकशीची मागणी करताच, त्यांना चौकशी होण्याआधीच नाेटीस पाठविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी दाेषींवर कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य रेणुका दिलीपराव वाघ यांनी केली आहे.