सभापती, उपसभापतीपदासाठी चुरस!
By Admin | Updated: March 12, 2017 02:12 IST2017-03-12T02:12:17+5:302017-03-12T02:12:17+5:30
१४ मार्च रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत: पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

सभापती, उपसभापतीपदासाठी चुरस!
बुलडाणा, दि. ११- १४ मार्च रोजी पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने बहुमत न मिळालेल्या पंचायत समितींमध्ये समीकरणे जुळविण्यासाठी पक्षांमध्ये काथ्याकूट करण्यात येत असून, काही ठिकाणी अभद्र युती होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली असून, होळीचा रंगोत्सव संपताच २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेत तर १४ मार्च रोजी पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. आगामी दोन दिवस सर्वत्र होळीच्या रंगाची उधळण होणार असली, तरी राजकीय वतरुळात मात्र पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत आहेत. पंचायत समितीच्या सभापतीची माळ आपल्या गळ्यात पडण्यासाठी सदस्य नेत्यांकडे फिल्डींग लावत आहेत.
बुलडाणा पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या एकूण १२ जागा असून, काँग्रेसचे पाच सदस्य विजयी झाले आहेत तर शिवसेना २, भाजप २, राष्ट्रवादी काँग्रेस १, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ व भारिपला एक जागा मिळाली आहे. पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याकरिता काँग्रेसला दोन जागांची गरज आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिपची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपही सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असून, आकड्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मोताळा तालुक्यात पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसला चार तर शिवसेना दोन, भाजप एक व भारिपला एक जागा मिळाली आहे. येथे काँग्रेसला ५0 टक्के जागा मिळाले असल्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. देऊळगाव राजा पंचायत समितीमध्ये एकूण सहा जागा असून, राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, चार जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला एक तर भाजपला एक जागा मिळाली आहे. मेहकरमध्येही शिवसेनेला स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापती व उपसभापती कुणाला करायचे, यासाठी पंचायत समिती सदस्य फिल्डींग लावून आहेत. मेहकरमध्ये १२ पैकी ९ जागांवर शिवसेनेच्या उमेदवाराचा तर दोन ठिकाणी काँग्रेस व एका पंचायत समिती सर्कलमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. लोणारमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, आठ पैकी शिवसेनेला चार तर काँग्रेसला व राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याकरिता एका जागेची गरज आहे.
भाजपाच्या गीता बोंडल सभापती?
जळगाव जामोद पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक मंगळवार १४ मार्च रोजी होत असून, जळगाव जामोदच्या सभापती म्हणून भाजपाच्या गीताबाई तेजसिंग बोंडल यांची अविरोध निवड होणे अपेक्षित आहे. कारण सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव असून, या प्रवर्गाच्या गीताबाई बोंडल या एकमेव पं.स. सदस्य आहेत. सभापतीसोबतच उपसभापती पदाचीसुद्धा निवडणूक होत असून, त्याकरिता मात्र अद्याप कोणाचेही नाव निश्चित झाले नाही. जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये आठ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ४ भाजपा, २ काँग्रेस, १ शिवसेना व १ भारिप-बमसं अशी पक्षनिहाय स्थिती आहे. सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदावर आसलगाव गणाच्या गीताबाई तेजसिंग बोंडल (भाजपा) या अविरोध विराजमान होणार आहेत. उपसभापतीपदासाठी मात्र रस्सीखेच होऊ शकते. प्रसंगी भाजपाने ह्यएकला चलो रेह्ण ची भूमिका घेतल्यास या पदासाठी ईश्वर चिठ्ठीसुद्धा होऊ शकते. अशा आठ पैकी सर्वाधिक चार जागा भाजपाकडे असल्या तरी बहुमतासाठी एक जागा कमी आहे. अशा परिस्थितीत भाजपा-शिवसेना या मित्रपक्षांनी मैत्री करून बहुमत मिळवू शकते.