जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या!

By Admin | Updated: June 23, 2016 23:28 IST2016-06-23T23:28:03+5:302016-06-23T23:28:03+5:30

जानेफळ येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यानंतर संजय रायमुलकर यांच्याकडून ग्रामसेवक व आरोग्य यंत्रणेला सूचना.

Care for the health of the people! | जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या!

जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या!

जानेफळ (जि. बुलडाणा): पावसाळ्याला सुरुवात होताच, अनेक गावांमध्ये गॅस्ट्रो व साथीचे आजार डोके वर काढतात. यावर उपाय म्हणून घाण व अस्वच्छतेकडे प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंचांनी जातीने लक्ष द्यावे आणि आरोग्य सेवक, डॉक्टर यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी दिल्या.
जानेफळ येथे २३ जून रोजी कृउबासच्या हॉलमध्ये आयोजित जानेफळ व देऊळगाव साकर्शा परिसरातील सर्व ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळी पं.स. सभापती सागर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सरतापे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, विस्तार अधिकारी शरद जाधव, पं.स. सदस्य गजानन वडणकर, जानेफळ उपसरपंच डॉ. सतीश कुळकर्णी, बीडीओ रविकांत पवार आदी उपस्थित होते. परिसरात गॅस्ट्रो व साथीच्या रोगांची लागण झाल्याने २१ जून रोजी सागर पाटील यांनी जानेफळ गावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच गावात त्वरित सफाईचे निर्देश दिले होते. यानंतर बीडीओ पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्याशी संपर्क करून जानेफळ येथे २३ जून रोजी जानेफळ, देऊळगावसाकर्शा परिसरातील सर्व ग्रामसेवक, सरपंच, आरोग्य सेवक तथा वैद्यकीय अधिकारी यांची एक बैठक बोलाविण्याबाबत चर्चा केली होती.
यानुसार २३ जून रोजी रोगांवर आळा घालण्यासाठी ही नियोजन बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी बोलताना सभापती पाटील यांनी सर्व ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांनी मुख्यालयीच राहून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सांगितले. बीडीओ पवार यांनीसुद्धा ग्रामसेवक, सरपंच तथा आरोग्यसेवक यांना पावसाळ्यात साथ रोगापासून जनतेच्या बचावासाठी दक्ष राहण्याच्या आणि गावात घाण पसरू न देता स्वच्छतेबाबत सक्ती करण्याच्या सूचना दिल्या.
 

Web Title: Care for the health of the people!