बस अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा; मर्दडी घाटात उलटली हाेती बस
By संदीप वानखेडे | Updated: October 8, 2023 17:01 IST2023-10-08T16:56:19+5:302023-10-08T17:01:20+5:30
बस बुलढाणा शहरातून निघाल्यानंतर मर्दडीच्या घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटात काेसळली हाेती.

बस अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा; मर्दडी घाटात उलटली हाेती बस
धाड : छत्रपती संभाजीनगर येथे जात असलेली मलकापूर आगाराची बस बुलढाणा शहरापासून जवळच असलेल्या मर्दडीच्या घाटात ६ ऑक्टाेबर राेजी काेसळली हाेती. या प्रकरणी एकनाथ श्रीराम एकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाड पाेलिसांनी बसचालक प्रवीण तेजराव गावंडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर येथून बस क्रमांक एमएच ४०-वाय-५४८१ ही छत्रपती संभाजीनगर येथे ६ ऑक्टाेबर राेजी सकाळी रवाना झाली हाेती. ही बस बुलढाणा शहरातून निघाल्यानंतर मर्दडीच्या घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटात काेसळली हाेती. सुदैवाने सागाचे झाड असल्याने ही बस अडकली हाेती. या अपघातात बसमधील १३ पैकी ४ प्रवासी गंभीर जखमी झाले हाेते. तसेच ९ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पाेखरी येथील एकनाथ श्रीराम एकडे यांनी धाड पाेलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी बसचे चालक प्रवीण तेजराव गावंडे यांच्याविरुद्ध धाड पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.