Buldhana: ६० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By सदानंद सिरसाट | Updated: February 9, 2024 13:56 IST2024-02-09T13:55:29+5:302024-02-09T13:56:07+5:30
Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Buldhana: ६० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
- सदानंद सिरसाट
संग्रामपूर (बुलढाणा) - संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईकडे तिच्याबाबत विचारपूस केली. ती बाहेर खेळायला गेल्याचे पीडितेच्या आईने आरोपीला सांगितल्याने तो तेथून निघून गेला. त्यानंतर आई मुलीला मोहल्ल्यात शोधण्यासाठी गेली. ती दिसून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईला संशय आल्याने तिने तत्काळ आरोपीच्या घराकडे धाव घेतली. मात्र, आरोपीच्या घराचे दोन्ही दरवाजे बंद दिसून आले. तेथून परत येताना घरातून मुलीचा आवाज आला. मुलीच्या आईने तातडीने आरोपीच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले. आतमध्ये डोकावताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.
नराधम आरोपी हा घरात मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसून आला. पीडितेच्या आईने दरवाजा जोरजोरात ठोकून आरोपीला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. मुलीला घरी आणून घटनेबाबत विचारपूस केली. त्यावेळी पीडितेने आईला आपबिती सांगितली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला आरोपी मुकिंदा इंगळे याच्याविरूद्ध कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब) भादंविसह कलम ८, १२ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.