Buldhana: रक्षा विसर्जनासाठी जात असलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, टिप्परच्या धडकेत दाेघांचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: July 3, 2023 14:32 IST2023-07-03T13:11:35+5:302023-07-03T14:32:49+5:30
Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून २५ मृतदेहांची अग्नी जळत नाही ताेच आणखी एक अपघात घडला आहे़ भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात असलेले दाम्पत्य ठार झाले.

Buldhana: रक्षा विसर्जनासाठी जात असलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, टिप्परच्या धडकेत दाेघांचा मृत्यू
- संदीप वानखडे
डाेणगाव - बुलढाणा जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून २५ मृतदेहांची अग्नी जळत नाही ताेच आणखी एक अपघात घडला आहे़ भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात असलेले दाम्पत्य ठार झाले. ही घटना ३ जुलै राेजी सकाळी १० वाजता लाेणीगवळी ते जानेफळ रस्त्यावर घडली. देविदास भिवसन पवार (वय ५०) व इंदुबाई देविदास पवार (वय ४६, रा. माेहना ता. मेहकर) अशी मृतांची नावे आहेत.
माेहना येथील देविदास पवार व त्यांची पत्नी इंदुबाई पवार हे दुचाकी क्र. एमएच २८ बीडी ७६१९ ने विश्वी येथील नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात हाेते. दरम्यान, मागून भरधाव येत असलेल्या टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ५७२२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की, दाेघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालकाने पळ काढला. त्यानंतर संतप्त जमावाने टिप्परची ताेडफाेड केली. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पाेलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण पोलिस अंमलदार पवन गाभणे, शंकर तांबेकर व चौगुले यांनी घटनास्थळावर धाव घेतली़ तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील शवागारात पाठविण्यात आले आहेत.