बुलडाणा : १० टक्के शेतकऱ्यांनीच केले पीक कर्जाचे नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:31 AM2021-06-07T11:31:42+5:302021-06-07T11:31:51+5:30

Buldana News: जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवघा १८ टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे. 

Buldana: Only 10% of farmers renewed crop loans | बुलडाणा : १० टक्के शेतकऱ्यांनीच केले पीक कर्जाचे नुतनीकरण

बुलडाणा : १० टक्के शेतकऱ्यांनीच केले पीक कर्जाचे नुतनीकरण

Next

- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी १० टक्केच शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण केले असून, २०१९मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमधील पात्र शेतकऱ्यांपैकी २४ हजार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवघा १८ टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे. 
परिणामी पीक कर्जासाठी पात्र १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना त्वरेने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ५ जून रोजी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या अंदाजानुसार चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख शेतकरी त्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करणार असल्याचा अंदाज हुकला आहे. 
पीक कर्ज वाटपाचा टक्का कशा पद्धतीने वाढेल, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेला आता आणखी प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये  १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २६ हजार ४८६ शेतकऱ्यांना आतापर्यंत २३३ कोटी २८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.  उद्दिष्टाच्या केवळ १९ टक्के शेतकऱ्यांना ते वाटप  झाले आहे. त्यातच पीक कर्जाच्या पुनर्गठणाचे अद्याप आदेश आलेले नाहीत. त्यामुळे  ही प्रक्रियाही रखडल्यात जमा आहे.


९० हजार शेतकऱ्यांचे नूतनीकरण बाकी
गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ६५ टक्के म्हणजेच १ लाख शेतकरी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे नवीनीकरण करतील, असा जिल्हा बँकर्स समितीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात १० टक्केच शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांच्या कर्जाचे नवीनीकरण केले आहे. अद्याप ९० हजार शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नवीनीकरण बाकी आहे.


नवीन शेतकऱ्यांचेही अर्ज नाहीत
जिल्ह्यात चालू खरीप हंगामात १६ हजार नवीन शेतकरीही पीक कर्जासाठी अर्ज करतील, असा अंदाज बांधला गेला होता. जिल्ह्यातील खातेफोडीच्या आधारावर साधारणत: हा अंदाज असतो. मात्र, अंदाजानुसार अशा १६ हजार शेतकऱ्यांनीही पीक कर्जासाठी अर्ज केलेला नाही.

Web Title: Buldana: Only 10% of farmers renewed crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.