बुलडाणा जिल्हय़ात शेतरस्ते घेत आहेत मोकळा श्‍वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:51 AM2017-12-15T00:51:21+5:302017-12-15T00:53:33+5:30

बुलडाणा :  गाव नकाशावर शेतरस्ते असतानाही प्रत्यक्षात ते रस्ते अतिक्रमणात अडकल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सोसावा लागतो. दरम्यान, बुलडाणा महसूल विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पायवाट, अतिक्रमणात अडकलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Buldana district sittras are breathing freely! | बुलडाणा जिल्हय़ात शेतरस्ते घेत आहेत मोकळा श्‍वास!

बुलडाणा जिल्हय़ात शेतरस्ते घेत आहेत मोकळा श्‍वास!

googlenewsNext
ठळक मुद्देबुलडाणा महसूल विभागाचा उपक्रम दिवसाला एक रस्ता पूर्णत्वाचे लक्ष्य

ब्रह्मनंद जाधव। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  गाव नकाशावर शेतरस्ते असतानाही प्रत्यक्षात ते रस्ते अतिक्रमणात अडकल्याने शेतकर्‍यांना मोठा त्रास सोसावा लागतो. दरम्यान, बुलडाणा महसूल विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पायवाट, अतिक्रमणात अडकलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. लवकरच ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. दिवसाला किमान एका शेतरस्त्याचे ‘टार्गेट’ पूर्णत्वास जात असल्याने गाव नकाशावरील शेतरस्त्यांनी मोकळा श्‍वास घेण्यास सुरुवात केली आहे.
पारंपरिक शेतरस्ते कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत आहेत. गाव नकाशावर रस्ता असतानाही मोठमोठय़ा पांदन शेतरस्त्याच्या भोवती झालेल्या अतिक्रमणामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शेतात जाण्यास सोयीचे होण्यासाठी बुलडाण्याच्या महसूल मंडळाच्यावतीने अनेक ठिकाणी पांदन शेतरस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.  
मोठय़ा पांदन रस्त्याची पायवाट निर्माण झाली असेल किंवा नकाशावर रस्ता असताना प्रत्यक्षात रस्ता नसेल अशा गावातील शेतकर्‍यांच्या बांधावर जावून त्यांना रस्ता पांधनमुक्ती करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. गत १५ दिवसांत १५ शेतरस्ते बुलडाणा मंडळांतर्गत मोकळे करण्यात आले आहेत. त्यासाठी गावोगावी तहसीलदार सुरेश बगळे, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील यांच्या माध्यमातून शेतरस्ते निर्माण करण्याचे काम सुरू आहे. बुलडाणा महसूल विभागाने दिवसाला एका शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे टार्गेटच हाती घेतले असून, यासाठी उत्स्फूर्त लोकसहभागही मिळत आहे. बुलडाणा महसूल विभागात राबविण्यात येत असलेला उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात लवकरच राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सर्व तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतरस्ते काही दिवसात अतिक्रमणापासून मुक्त होतील. 

अतिक्रमणात अडकलेले शेतरस्ते लोकसहभागातून काढण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.  बुलडाणा तालुक्यात अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले असून, जिल्हाभरातील शेतरस्ते मोकळे करण्यात येणार आहेत.
- डॉ.चंद्रकांत पुलकूंडवार,
जिल्हाधिकारी.
-
 

Web Title: Buldana district sittras are breathing freely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.