बुलडाणा जिल्हा तापाने फणफणला
By Admin | Updated: September 19, 2014 00:51 IST2014-09-19T00:51:54+5:302014-09-19T00:51:54+5:30
वातावरणातील बदलामुळे रुग्णालये फुल्ल

बुलडाणा जिल्हा तापाने फणफणला
बुलडाणा : गत काही दिवसात वातावरणात मोठा बदल झाला. सततच्या पावसामुळे तसेच दूषित पाणी आणि डासांची उत्पत्ती वाढल्याने शहर आणि ग्रामीण परिसरात विविध आजाराचे थैमान वाढले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. शिवाय शहरात डेंग्यूसदृश आजाराने हातपाय पसरले असून, आतापयर्ंत शेकडो रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याने संपूर्ण जिल्हाच तापाने फणफणला असल्याचे चित्र आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्यातील खड्डे पाण्याने भरून आहे. शिवाय सर्वत्र घाण साचत आहे. यामुळे डासांची संख्या वाढून मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया, डेंग्यू तसेच चिकुणगुनियासारखे आजार शहरात तोंड वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असताना वाढत्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात पुरेशी व्यवस्था रुग्णालयाकडे नाही.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अतिसार, गॅस्ट्रो असल्याच्या नोंदी जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार बुलडाणा तालुक्यात गॅस्ट्रोचे ३२ आणि अतिसाराचे २३ रुग्ण आढळले आहे. शिवाय शहरी भागातील ३४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तापाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे; मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.