बुलडाणा जिल्ह्यात ‘ताप’ वाढला
By Admin | Updated: July 29, 2014 23:29 IST2014-07-29T23:29:13+5:302014-07-29T23:29:13+5:30
खासगीसह शासकीय रुग्णालये हाऊसफुल; आरोग्य विभागाकडून उपाययोजना नाहीत

बुलडाणा जिल्ह्यात ‘ताप’ वाढला
बुलडाणा : ढगाळ वातावरण, लगेच रिमझिम पाऊस, एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा कडाक्याचं उन्ह. या वातावरणातील चढ-उतारामुळे जिल्हय़ात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली असून, खासगीसह शासकीय रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असली तरी आरोग्य विभागाच्या लेखी मात्र अद्याप सर्व काही ठीक आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सोमवारी काही भागात झडीचे वातावरण तर काही भागात कडाक्याचं उन्हं, अशा विरोधाभासी वातावरणामुळे जलजन्य व कीटकजन्य आजारासोबतच कावीळ, डायरियाची साथ असल्याची माहिती शहरासह जिल्हय़ातील डॉक्टर व शासकीय रुग्णालयांमधून घेतलेल्या माहितीमधून समोर आली आहे. बुलडाणा शहरासह जिल्हय़ात कावीळ व अज्ञात तापाचीही साथ आहे. लहान मुले व वृद्धांसह अनेकांना कावीळ आजार तसेच अज्ञात तापाने त्रस्त केले आहे. या वातावरणामुळे दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढला असून, श्वसन व घशाच्या आजारांसोबतच डेंग्यू, सर्दी, ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घशात खवखव होणार्या रुग्णांचा त्रास या वातावरणातील बदलामुळे वाढला असून, घशातील खवखव जास्त दिवस राहिल्यास इतर गंभीर आजार होण्याचा धोका संभत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. डोळय़ांची जळजळ होत असल्यास या आजारांकडेही दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
** बुलडाणा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी
बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची गर्दी असून, यामध्ये डायरिया, मलेरिया रुग्ण अधिक आहेत. तसेच हिवताप, डेंगी ताप व अशक्तपणा असे अनेक रूग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सामान्य रूग्णालयात दाखल तापेच्या रूग्णापैकी मलेरिया संशयीत ४0 व जिल्ह्यातील ५0 असे ९0 रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
** लहान मुलांना त्रास
लहान मुलांना घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला व तापाच्या आजारांनी ग्रासले आहे. खासगी बाल रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून, बालकांना या वातावरणामुळे दमा, छाती दुखणे व ताप यासारख्या आजारांनी हैरान केले आहे. बालकांना श्वसनाचा अधिकच त्रास होत असल्याने शहरातील बाल रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.
** साथीच्या आजाराची शक्यता
शहरातील घाण पाण्यामध्ये एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून, यापासून डेंगी ताप, मलेरिया, डायरिया, सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंगी हिमोरेजीक फिवर, डेंगी शॉक सिंड्रोम या आजारांची लागण होत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून फॉगिंग व फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे.