बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
By Admin | Updated: August 22, 2014 23:34 IST2014-08-22T23:34:56+5:302014-08-22T23:34:56+5:30
शिवसेनेच्या मोर्चात शेतकर्यांना एकरी ५0 हजार रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.

बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, वगळलेल्या बुलडाणा तालुक्याचा टंचाई घोषित तालुक्यामध्ये समावेश करावा आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेचा मोर्चा खासदार प्रतापराव जाधव, आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जिजामाता क्रीडा संकुलमधून हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारलाईन, कारंजा चौकातून स्टेट बँक चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव, आ.विजयराज शिंदे, आ.संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, धीरज लिंगाडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख अमरदीप देशमुख, राजेश देशमाने यांनी मागण्यांचे निवेदन सादर करून जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली.
जिल्हाभरामध्ये पेरणीयोग्य पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे अत्यल्प पावसावरच उशिराने पेरण्या कराव्या लागल्या. त्यातच सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने अप्रमाणित बियाण्यांची पेरणी शेतकर्यांना करावी लागली. त्यामुळे बियाणे उगवले नसल्याने पेरण्या उलटल्या. त्यामुळे शेतकर्यांचा यावर्षीचा खरीप हंगाम १00 टक्के हातातून गेला; दरम्यान पाऊस गायब झाल्याने संपूर्ण पिके सुकून गेली. राज्य शासनानेसुद्धा जिल्ह्यामध्ये टंचाई घोषित केलेली असल्याने व खरीप हंगाम हातातून गेल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना एकरी ५0 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. वगळलेल्या बुलडाणा तालुक्याचा टंचाई घोषित तालुक्यामध्ये समावेश करावा.
यावेळी मोर्चात उपजिल्हा प्रमुख शांताराम जगताप, डॉ.प्रतापसिंग राजपूत, शशिकांत खेडेकर, दिलीपबाबू देशमुख, वसंतराव भोजने, अविनाश दळवी, तालुकाप्रमुख अर्जुन दांडगेसह अन्य आंदोलक उपस्थित होते.