धारतीर्थावरील संरक्षण भिंतीला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST2021-03-22T04:31:20+5:302021-03-22T04:31:20+5:30
लोणार : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवर काठावर धारतीर्थ आहे. येथे सतत पडणारी धार हे पर्यटकांचे खास आकर्षण ...

धारतीर्थावरील संरक्षण भिंतीला तडे
लोणार : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवर काठावर धारतीर्थ आहे. येथे सतत पडणारी धार हे पर्यटकांचे खास आकर्षण असून येथून सरोवराचा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी पर्यटक येतात. जेथून सरोवराचा देखावा पाहतात, तेथील सरंक्षण भिंतीला जागोजागी तडे गेले आहेत. या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. तडे गेलेली भिंत अचानक कोसळल्यास भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
लाखो रुपये खर्च करून पर्यटकांच्या संरक्षण करण्याच्या दृष्टीने धारतीर्थावर संरक्षण भिंत पुरातत्त्व विभागाच्या वतीने बांधण्यात आलेली आहे. परंतु या भिंतीला जागोजागी मोठमोठे तडे गेल्याने भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पर्यटकांची वर्दळ पाहता याच सरंक्षण भिंतीजवळ उभे राहून सरोवराच्या निसर्गरम्य देखाव्याचा आनंद लुटतात व येथून फोटोही टिपतात. पण अशातच ही तडे गेलेली भिंत कोसळून अपघाताची घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सरोवर विकासासाठी १०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर दुसरीकडे मात्र संबंधित विभागाकडून अशी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असतील तर या निधीचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा असतानाही या तडे गेलेल्या भिंतीची दुरुस्ती केली गेली नाही. यासाठी जागोजागी मोठमोठे तडे गेलेल्या भिंतीची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी पण निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित विभागाची चौकशीही करावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.