घोंगडी बैठक ठरतेय राष्ट्रवादीची संघटनात्मक नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:48+5:302021-09-25T04:37:48+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान भाषणात घोंगडीचा संदर्भ आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य डी. एस. लहाने यांना ...

The blanket meeting is the organizational umbilical cord of the NCP | घोंगडी बैठक ठरतेय राष्ट्रवादीची संघटनात्मक नाळ

घोंगडी बैठक ठरतेय राष्ट्रवादीची संघटनात्मक नाळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान भाषणात घोंगडीचा संदर्भ आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य डी. एस. लहाने यांना घोंगडी बैठकीची कल्पना सुचली आणि बघता बघता दोन महिन्यांत बुलडाणा तालुक्यातील ९१ गावांत या पद्धतीने बैठकांचे आयोजन करून ग्रामीण भागात पक्षाची नाळ जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे बुलडाणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर चांगलेच बळ मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

--ग्रामीण समस्या जाणून घेण्यास मदत--

या बैठकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसह, नागरी समस्या तथा ग्रामीण जीवनात येणाऱ्या अडचणी यांची सविस्तर व खुल्या मनाने गावागावांत चर्चा झाली. ग्राम पातळीवर नागरिकांना नेमके काय हवे आहे तसेच त्यांच्या अडचणी व समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सोडविण्यास कसे प्राधान्य देता येईल, हा मुद्दाही यामुळे चर्चीला गेला. त्यात ग्रामीण जीवनात छोट्या-मोठ्या कार्यक्रमात आपुलकीच्या भावनेने ज्या पद्धतीने बैठका होतात त्याच पद्धतीने या बैठका झाल्याने बुलडाणा तालुक्यातील जनसामान्य सहजपणे या बैठकांमध्ये बोलते झाले व त्यांच्या अडचणी समजून घेण्यास मदत मिळाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याच बैठकांच्या माध्यमातून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ध्येय-धोरणे पोहोचवितानाच सामाजिक सौहार्द निर्माण करण्यावरही भर दिला गेला.

--राज्यस्तरावर उपक्रम राबविण्यासारखा--

घोंगडी बैठकांच्या माध्यमातून बुलडाणा तालुक्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण जीवनाशी नाळ घट्ट होत आहे. याची उपयुक्तता आणि संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा उपक्रम प्रसंगी राज्यस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राबविण्यासारखा आहे, असे मत खुद्द अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन दिवसांपूर्वी कोलवड येथे झालेल्या अशाच कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी होते.

--महिलांचाही सक्रिय सहभाग--

या उपक्रमामुळे बुलडाणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचीही संघटनात्मक बांधणी करण्यास मदत मिळाली आहे. तालुक्यात जवळपास १५ गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शाखा स्थापन करण्यास या बैठकांचा हातभार लागला असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

Web Title: The blanket meeting is the organizational umbilical cord of the NCP