डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र!

By Admin | Updated: December 7, 2015 02:48 IST2015-12-07T02:48:02+5:302015-12-07T02:48:02+5:30

पश्‍चिम विदर्भात खामगाव नगरपालिकेत प्रयोग; बनावट स्वाक्षरीला पायबंद.

Birth certificate issued by digital signature! | डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र!

डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र!

खामगाव (जि. बुलडाणा): डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याचा मान पश्‍चिम विदर्भात खामगावच्या नगरपालिकेला मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य ११ पालिकांमध्येही यासंदर्भातील डाटा संगणकीकृत करण्यात येत असून, लवकरच तेथेही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल स्वाक्षरीद्वारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने उपसंचालक, आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक, जन्म व मृत्यू (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी ३0 जून २0१५ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांशी संबंधित आवश्यक संसाधनांची जुळवाजुळव करून नगरपालिका प्रशासनाने ३ डिसेंबरपासून अद्ययावत दाखले देण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे दाखले देणारी पश्‍चिम विदर्भातील खामगाव नगरपालिका पहिली ठरली आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसोबतच बांधकाम परवानगी आणि तत्सम कागदपत्रेदेखील डिजिटल स्वाक्षरीने देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. दाखले तात्काळ मिळण्याच्या सोयीमुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.
डिजिटल स्वाक्षरीची विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी शासनाने जन्म-मृत्यू अधिनियमासोबतच आयटी अँक्टच्या कलम ४ अन्वये या प्रमाणपत्रास अधिक सुरक्षा प्रदान केली आहे. अमरावती महापालिकेनंतर पश्‍चिम विदर्भात खामगाव पालिकेने अद्ययावत तंत्रज्ञानाने दाखले देण्यास प्रारंभ केला असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डी.ई. नामवाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: Birth certificate issued by digital signature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.