ॲपेवर दुचाकी धडकली, वैद्यकीय अधिकारी ठार
By संदीप वानखेडे | Updated: August 11, 2023 16:36 IST2023-08-11T16:35:54+5:302023-08-11T16:36:20+5:30
दुसरबीड येथील घटना : बेशिस्त वाहनामुळे घडला अपघात

ॲपेवर दुचाकी धडकली, वैद्यकीय अधिकारी ठार
संदीप वानखडे, दुसरबीड : उभ्या असलेल्या ॲपेवर दुचाकी धडकल्याने वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत प्रभाकर ताठे हे गंभीर जखमी झाले हाेते. त्यांचा १० ऑगस्ट राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामुळे दुसरबीड बसस्थानकावर उभ्या करण्यात येत असलेल्या बेशिस्त वाहनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अडगाव राजा येथून ड्युटी संपल्यानंतर ९ ऑगस्ट राेजी डॉ. प्रशांत प्रभाकर ताठे हे घराकडे जात हाेते. दरम्यान, दुसरबीड गावाजवळ समाेर जात असलेल्या ट्रकला ते पास करणार हाेते. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या ॲपेवर त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले हाेते. त्यांना जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा १० ऑगस्ट राेजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, वडील, आई, भाऊ असा आप्तपरिवार आहे.
अतिक्रमणामुळे वाढले अपघात
दुसरबीड येथील बसथांबा परिसरात महामार्गावर वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात येतात. तसेच सिंदखेडराजा व मेहकर मार्गाच्या दाेन्ही बाजूने व्यावसायिकांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात वाढले आहेत. गेल्यावर्षी रस्त्यावरील अतिक्रम काढण्यात आले हाेते; परंतु, काही कालावधीनंतर हे अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. हे अतिक्रमण तसेच बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.