बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील पालधीवाल पेट्रोल पंपावर इंधन भरताना अचानक दुचाकीने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इंधन भरताना दुचाकी पेटल्याची माहिती समजताच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती दुचाकीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येतो. इंधन भरत असताना दुचाकीस्वार कर्मचाऱ्याला पैसे देतो. त्यानंतर पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी दुचाकीस्वारला सुट्टे पैसे देण्यासाठी स्वत:च्या खिशात पाहतो. तितक्यात दुचाकी पेट घेते. हे पाहून दुचाकीस्वार घाबरतो आणि दुचाकी तिथेच सोडून जातो. परंतु, घटनास्थळी उपस्थित असलेला कर्मचारी प्रसावधान दाखवत अग्निशामक यंत्र घेऊन आगीवर नियंत्रण मिळवतो, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळते.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनच्या वापरामुळे ही आग लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. याचबरोबर अधिकाऱ्यांनी दीर्घकालीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा पुनरुच्चार केला. इंधन भरताना मोबाईल फोन लॉक न करता पूर्णपणे बंद करावे. इंधन डिस्पेंसरजवळ फोनचा वापर केल्याने आग निर्माण होण्याची दाट शकते, असे त्यांनी म्हटले. पेट्रोल पंपावर इंधन भरताना यूपीआय सारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी ग्राहकाला केले. ग्राहकांनी शक्य असेल तर इंधन भरण्यासाठी रोख रक्कम द्यावी, ज्यामुळे अशा घटना थांबवल्या जाऊ शकतात.