दुचाकीला रानडुकरांची धडक, डोक्याला दुखापत होऊन युवकाचा मृत्यू, लग्नाला जायला निघाला...
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 9, 2024 14:32 IST2024-04-09T14:32:21+5:302024-04-09T14:32:59+5:30
Bhandara Accident News: धावत्या दुचाकीला रानडुक्करने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचार दरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली.

दुचाकीला रानडुकरांची धडक, डोक्याला दुखापत होऊन युवकाचा मृत्यू, लग्नाला जायला निघाला...
- गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा - धावत्या दुचाकीला रानडुक्करने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचार दरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली. सदर घटना सॅनफ्लॅग कंपनी जवळच्या बायपास पुलावर काल (८ एप्रिल) मध्यरात्री ११.१५ च्या दरम्यान घडली.
समीर हा रायपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. जवळच्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने तो काल रात्री रायपूर येथून रेल्वेने आला होता. भंडारा जवळील वरठी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कुणाल वाघमारे याने त्याला सोबत घेतले. दरम्यान एकलारीला न जाता ते दोघेही भंडाराला मामाकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान बायपास पुलावर रानडुक्करांचा कळप अचानक रस्त्यावर धावत सुटला व दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार व त्याचा सोबती रस्त्यावर कोसळले. दरम्यान समीर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ भंडारा येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. पण दुखापत गंभीर असल्याने त्याला शासकीय दवाखान्यात भरती करताना उपचार दरम्यान मृत्यू झाला. अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व पोलिस हवालदार नितीन भालाधरे करीत आहेत.