केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ देण्यासाठी अडवणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:34 IST2020-12-22T17:29:39+5:302020-12-22T17:34:25+5:30
Demand Money to give Newborn baby केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक करण्याची घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली.

केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ देण्यासाठी अडवणूक !
चिखली : सरकारी रूग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रूग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. येथील ग्रामीण रूग्णालयातही असेच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडले आहेत. कामचुकारपणाचा कळस व पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक करण्याची घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली. तर २१ डिसेंबरच्या रात्री प्रसव वेदनेने विव्हळणाº महिलेकडे साफ दूर्लक्ष केल्या गेले. नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईला करावी लागली. या स्थितीतही सुमारे हजार रूपये उकळण्यात आले.
पार्वती सुरडकर यांनी आपल्या गरोदर मुलीला १९ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्याने रूग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी १२०० रूपयांची मागणी केली. मुलीचा त्रास पाहता पार्वतीबाईनी ती मागणी मान्य केली. मात्र, प्रसुतीपश्चात त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी करण्यात आली. मोलमजुरीने उदरनिर्वाह करणाऱ्या पार्वतीबाईकडे त्यावेळी दीड हजार रुपयेच होते. त्यात रात्रीची वेळ पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्या महिलेला पडला होता. मात्र, लालसेची परिसीमा गाठलेल्या संबंधीत महिला कर्मचाऱ्यांनी उर्वरित पाचशे रूपये द्या तेव्हांच बाळ देईल, अशी अडवणूक केली आहे. याबाबत पार्वतीबाईंनी लेखी तक्रार देखील केली आहे.
दुसऱ्या प्रकरणात सवणा येथील शे. समीर शे. सत्तार यांनी २१ डिसेंबरच्या रात्री आपल्या बहिणीला प्रसुतीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. या महिलेला १० वाजेच्या सुमारास प्रसुतीवेदना सुरू झाल्याने महिलेच्या कुटूंबियांनी रूग्णालयात कार्यरत परिचारकांना याबाबत माहिती देवून पेन्शटला पाहण्याची विनंती केली. मात्र, संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णास पाहण्याचे सोडून सकाळी प्रसुती होईल असे सांगून रुग्णाकडे पाहण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान गरोदर महिलेला त्रास वाढल्यानंतर पुन्हा माहिती दिली असता बुलडाणा येथे पाठविण्याची धमकी दिली. तिसऱ्यांदा विनंती केली असता महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णाकडे पाहण्याचे टाळले. नाईलाजाने महिलेच्या तीव्र प्रसुती वेदना पाहता तिच्या आईनेच स्वत: तिची प्रसुती सुकर केली. रुग्णालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष तर केलेच शिवाय कुटुंबियाकडून ५०० रुपयेही घेतले. याखेरीज साफसफाई करणाऱ्या महिलेने २०० तर रक्त-लघवी तपासणीसाठी वेगले ३०० रुपे घेण्यात आल्याचा आरोप शेख समीर यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे.
पार्वतीबाईंचा व्हिडीओ व्हायरल !
केवळ पाचशे रूपयांसाठी बाळ देण्यास टाळल्याची तक्रार करणाऱ्या पार्वतीबाई सुरडकर यांच्या तक्रारीचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत करण्यात आला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यातून रूग्णालयात चाललेल्या अनागोंदीची पोलखोल झाली आहे.
चौकशी समिती स्थपान करून अहवाल पाठवणार
या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करून दोन्ही परिचारिका दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक डॉ. फारूखी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आयशा तबस्सुम खान यांनी सांगितले.