केळीचे पीक झाले भुईसपाट
By Admin | Updated: June 4, 2014 00:47 IST2014-06-04T00:41:34+5:302014-06-04T00:47:13+5:30
संग्रामपूर तालुक्यातील २ जून रोजी रात्री अचानक झालेल्या वादळी वार्याने केळीचे पिक भुईसपाट.

केळीचे पीक झाले भुईसपाट
काकणवाडा: संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथे १ व २ जून रोजी रात्री अचानक झालेल्या वादळी वार्याने केळीचे पिक भुईसपाट केले आहे. यामध्ये हजारो खोड उध्वस्त झाले आहेत. अचानक आलेल्या या आघाताने सर्वसामान्य जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या नैसर्गिक अवकर्षणाचा महसूल विभागाकडून सर्व्हे करण्यात आला असून नुकसानग्रस्तांना आता मदतीची आस लागली आहे. काकणवाडा गावात केळीचे उत्पादन घेणारे शेतकरी जास्त आहेत. लहान मुलांच्या संगोपनापेक्षाही जास्त काळजी केळी पिकाची लागवड पासुन घ्यावी लागते. महागडा खर्च करून शेकडो एकरावर केळी लागवड करण्यात आली. निसर्गाच्या लहरीपणामुळे २ जुनची रात्र केळी पिकासाठी घातक ठरली. एकदम जोराची हवा सुटली आणि सर्वकाही हिरावून नेलं. वादळी पावसामुळे केळीचे झाडे उन्मळून पडली. परिसरातील ४0 ते ५0 एकारापेक्षाही जास्त क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली. ही झाडे पाहून ज्यांनी या पिकाच्या भरवशावर हिरवी स्वप्ने रंगवली होती. त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. भुईसपाट झालेल्या केळी पाहून बरेच कुटुंबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता पिकच उरले नाही तर पुढचे जगणे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाकडून भरीव भरपाईची मागणी होत आहे. महसुलविभागाकडून तलाठी कांबळे या नुकसानीचे सर्वेक्षण करीत आहेत. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शासनाने भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.