सैलानीत बाबू ऊर्फ शेख नफिजचा धारदार शस्त्राने खून; तीन आरोपी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:24 IST2025-08-23T17:23:56+5:302025-08-23T17:24:08+5:30
गंभीर जखमी झालेल्या बाबूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सैलानीत बाबू ऊर्फ शेख नफिजचा धारदार शस्त्राने खून; तीन आरोपी अटक
बुलढाणा : हिंदू-मुस्लिमांची आस्था असलेल्या बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे शनिवारी मध्यरात्री जुन्या वैमनस्यातून बुलढाणा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शेख नफिज शेख हफिज ऊर्फ बाबू (वय ३८) याचा धारदार शस्त्राने वार करत तथा लाकडी दांड्याने मारहाण करून खून करण्यात आला.
शनिवारी (दि. २३ ऑगस्ट) रात्री साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास बरीबाबा दर्ग्यासमोर रस्त्यावर हल्लेखोरांनी बाबूवर प्राणघातक हल्ला चढवला. अलेक्स इनोक जोसेफ ऊर्फ रोनी (२२), शेख सलमान शेख अशपाक (२५) आणि सैयद वाजीद सैय्यद राजू ऊर्फ वाजीद टोपी (सर्व रा. सैलानी, ता. बुलढाणा) या तिघांनी मिळून जुन्या भांडणाचा वाद चिघळताच धारदार शस्त्र व दांड्याने बाबूवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बाबूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सोळंके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक आणि रायपूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून अवघ्या तीन तासांत आरोपी व त्यांच्या दुचाकीचा शोध लावत जालना जिल्ह्यातील माहोरा (ता. जाफ्राबाद) येथे तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली.
या प्रकरणी शेख हाशिम शेख हाफिज (रा. इंदिरानगर, बुलढाणा) याच्या तक्रारीवरून रायपूर पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम १०३ (१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रायपूर पोलिस करत आहेत.