हैदराबादमधील ६८ वर्षीय अवलियाने सायकलने गाठले सैलानी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:51+5:302020-12-26T04:27:51+5:30
चिखली : लाखो सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान सैलानी बाबांच्या दर्शनासाठी हैदराबादमधील एका ६८ वर्षीय अवलियाने ५ दिवसांत ६०० पेक्षा अधिक किलोमीटरचा ...

हैदराबादमधील ६८ वर्षीय अवलियाने सायकलने गाठले सैलानी !
चिखली : लाखो सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान सैलानी बाबांच्या दर्शनासाठी हैदराबादमधील एका ६८ वर्षीय अवलियाने ५ दिवसांत ६०० पेक्षा अधिक किलोमीटरचा सायकल प्रवास करून सैलानीबाबांवरील श्रद्धेसह आरोग्य, शांती आणि पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
तेलंगाना राज्याची राजधानी हैदराबादमधील बंदलागुडाचे रहिवासी मोहम्मद दस्तगीर हे ६८ वर्षांचे आहेत. सतत सायकल चालवित असल्याने त्यांच्यात उतारवयातही तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा दिसून येते. हे सर्व सायकल चालविल्याने शक्य असल्याने नव्या पिढीला सायकल चालविण्याचे फायदे कळावेत, आरोग्यासह पर्यावरण संरक्षणाचेही महत्त्व कळावे, या हेतूने त्यांनी हैदराबाद ते सैलानी बाबा दर्गाहपर्यंत सायकलने प्रवास केला आहे. यानुषंगाने २० डिसेंबर रोजी आपल्या सायकलद्वारे त्यांनी या यात्रेस सुरुवात केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी ते चिखली येथे पोहोचले आहेत. सद्यस्थितीत स्थानिक खैरुलाखाह बाबांचे दर्शन घेतल्यानंतर सैलानी बाबांच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. यापूर्वी त्यांनी सन २०१५ मध्ये हैदराबाद ते कर्नाटकमधील गोधडी येथील दर्गाहपर्यंत २३० किलोमीटरचा प्रवास १३ घंट्यांत पूर्ण केलेला असून, याठिकाणी सायकलने जाण्याचा त्यांचा शिरस्ता कायम आहे. याखेरीज हैदराबाद ते कर्नाटकमधील गुलबार्गा ख्वाजा बंदा नवाज दर्गाह २६० कि.मी., २०१७ मध्ये हैदराबाद ते नागपूर सुमारे ५५० किलोमीटर प्रवास करून बाबा ताजुद्दीन दर्गाहाचे दर्शन घेतले आहे. यावर्षी ते प्रथमच सैलानी बाबांच्या भेटीसाठी निघाले होते. सुमारे ६०० कि.मी.पेक्षा अधिक अंतर कापून चिखली येथे पोहोचले आहेत.
पूर्वी वाहनांची सुविधा नसल्याने पायी अथवा सायकलचा उपयोग होत होता. त्यामुळे आरोग्याच्या समस्या फार उद्भवत नव्हत्या. सायकलमुळेच मलाही आरोग्य समस्या उद्भवलेल्या नाहीत, हा माझा अनुभव असल्याने प्रत्येक नागरिकाने दिवसातून किमान एक तास सायकल चालवावी व निरोगी रहावे, हाच संदेश मी माझ्या प्रवासादरम्यान देत असतो.
मोहम्मद दस्तगीर, हैदराबाद.