Aryan and Dravidian 'DNA' are same - Sadanand Sapre | आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे
आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ एकच - सदानंद सप्रे

ठळक मुद्देऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. ‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले.

खामगाव - ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारत देशातील आर्य आणि द्रविडांचा ‘डीएनए’ हा एकच आहे. मात्र, परकीयांनी भारतीयांचा बुद्धीभेद केला असून, या बुद्धीभेदातून आम्ही आजही बाहेर पडायला तयार नाही, हीच आमची शोकांतिका आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन आंतराष्ट्रीय स्तरावरील व्याखाते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व विभागाचे सहसंयोजक सदानंद सप्रे यांनी येथे केले.

भारतीय नागरिक उत्थान समिती आणि भारतीय विचार मंच, खामगावच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक टिळक स्मारक मंदिरात आयोजित जाहीर व्याख्यानात ते शनिवारी सायंकाळी बोलत होते. त्यांच्या व्याखानाचा विषय ‘वैचारिक गुलामीसे भारत की मुक्ती’ हा होता. यावेळी व्यासपीठावर सुभाष लोहे, भारतीय नागरिक उत्थान समितीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, भारतीय विचार मंचाचे जिल्हा संयोजक विनय वरणगांवकर यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल अग्नीहोत्री, संजय बोरे, विकास कुळकर्णी, दिलीप शेट्ये, गजानन वायचाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी सदानंद सप्रे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना ‘चले जाव’साठी प्रेरीत केले असता, त्यांनी भारतात आधी आर्य आणि नंतर इंग्रज आले. इंग्रज आणि आर्य हे दोन्ही परकीय आहेत. त्यामुळे इंग्रजांसोबतच आर्यांनी देखील भारत सोडला पाहीजे, असा आग्रह धरला. आर्य आणि द्रविड वेगवेगळे असा चुकीचा आणि खोटा सिध्दांत प्रस्थापित केला. मात्र, वस्तुस्थितीत ‘वैचारिक आणि वैज्ञानिक’ अशा दोन्ही दृष्टीकोनातून आर्य आणि द्रविडांचा डीएनए हा एकच आहे. असे सप्रमाण सिध्द झाले आहे. मात्र, आजही आम्ही ‘आर्याचे आक्रमण’ शिकविल्या जाते. ही वैचारिक गुलामगिरी असून, वैचारिक दृष्टीकोनातील गुलामी ही अतिशय वाईट आहे. केवळ बुध्दीभेदच नव्हे तर व्यक्ती-व्यक्तीत तिरस्कार निर्माण करणारी आहे. त्यामुळे सजगतेतून ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले. 

‘आर्य’ हा जातीवाचक नव्हे, तर गुणवाचक शब्द असल्याचेही त्यांनी सोदाहरण देऊन स्पष्ट केले. यावेळी वैचारिक गुलामगिरीच्या अनेक खोट्या सिध्दांतावर त्यांनी प्रहार केला. वैचारिक गुलामगिरी संदर्भातील  चुकीचे सिध्दांत वेगवेगळे उदाहरण देत, खोडून काढले. यावेळी श्रोत्यांमधून उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. अनेकांच्या शंकांचे निरसनही केले. 

संस्कार महत्त्वाचे!

भारतीय संस्कृतीत संस्काराचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पाश्चात्य लोकही भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताहेत. मात्र आम्हाला आपल्या पुरातन संस्कृतीचा विसर पडला आहे. वैचारिक गुलामगिरी झुगारून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी  झटलं पाहिजे. अगदी मुलांच्या वाढदिवसापासून आपण भारतीय संस्कृतीच्या जतनाची सुरुवात करू शकतो. मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करणे निश्चितच चांगले नाही. असे ते म्हणाले.


Web Title: Aryan and Dravidian 'DNA' are same - Sadanand Sapre
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.