संतनगरी शेगावात २६८ भजनी दिंड्यांचे आगमन
By Admin | Updated: April 3, 2017 03:13 IST2017-04-03T03:13:05+5:302017-04-03T03:13:05+5:30
श्रीराम जन्मोत्सवसाठी २ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत २६८ भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन झाले.

संतनगरी शेगावात २६८ भजनी दिंड्यांचे आगमन
गजानन कलोरे
शेगाव(जि. बुलडाणा), दि. २- श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा होत असून या उत्सवासाठी २ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत २६८ भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन झाले.
श्रीराम नवमी उत्सवनिमित्त श्री गजानन महाराज संस्थानमध्ये २८ मार्चपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. सकाळी ५ ते ६ काकडा, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, रात्री ८ ते १0 किर्तन हे नित्यप्रमाणे होत आहे. मंदीर परिसरात सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई उत्सवासाठी करण्यात आली आहे. मंदीर परिसरात उत्सवादरम्यान गर्दी होईल हे लक्षात घेऊन वनवे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांच्या सोयीसाठी निवास व्यवस्था ही अल्पदरात श्री मंदीर परिसर, भक्तनिवास संकुल ३,४,५,६, आनंद विहार, भक्तनिवास संकुल, आनंदसागर विसावा येथे भाविकांच्या सोयीकरिता असलेल्या खोल्या नियमानुसार उपलब्ध आहेत.
रविवार रोजी हभप तुकाराम बुवा सखारामपुरकर यांचे किर्तन तर ३ रोजी श्रीरामबुवा ठाकूर, ४ रोजी हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे किर्तन होत आहे. श्रीराम नवमी ४ एप्रिल रोजी विष्णूबुवा कव्हळेकर यांचे सकाळी १0 ते १२ श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन होत आहे. या उत्सवात अध्यात्म रामायण स्वाहाकार यागास १ एप्रिल रोजी आरंभ झाला आहे. राक्षसभुवन येथील पोपट महाराज चौथाईवाले यांच्या वैदीक मंत्रोपच्चारात विधिवत पुजन अध्यात्म रामायण स्वाहाकार यागाचे पुजन होत आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. दु.२ वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज अश्वासह नगर परिक्रमा निघेल. ५ रोजी हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे सकाळी ७ वाजता काल्याचे किर्तन व नंतर दहीहांडी गोपाळकाळा होणार आहे.