स्वाईन फ्लूची आणखी एकला लागण
By Admin | Updated: May 19, 2017 19:52 IST2017-05-19T19:52:19+5:302017-05-19T19:52:19+5:30
शहरात पॉझीटिव्ह तर सुटाळ्यात आढळला संशयित रूग्ण

स्वाईन फ्लूची आणखी एकला लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अकोला, अमरावती या मोठ्या शहरात थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लू आजाराने खामगावातही शिरकाव केला आहे. याअगोदर शहरातील हिरानगरातील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला असून स्थानिक गांधी चौकात आणखी एक स्वाईन फ्लूचा पॉझीटिव्ह रूग्ण आढळला आहे. तसेच सुटाळ्यातही संशयित रूग्ण आढळून आला असल्याची माहिती रूग्णालयीन सुत्रांकडून मिळाली.
स्वाईन फ्लू आजार अकोला व अमरावतीत मोठ्या प्रमाणावर पसरला असून अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे काहींचा मृत्यू झाला आहे. तर काही मरणासन्न अवस्थेत आहेत. हवेतून पसरणारा हा संसर्गजन्य आजार खामगावातही आला आहे. नुकतेच स्थानिक गांधी चौकातील एका ७५ वर्षीय वृध्दास या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर रूग्ण हा स्वाईन फ्लू पॉझीटिव्ह असून त्यांच्यावर सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. तसेच सुटाळा येथील एका गर्भवती महिलेला सुध्दा स्वाईन फ्लू ची लक्षणे आढळून आली आहेत. सदर महिलेवर येथील सिव्ल्हरसिटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान येथील सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने गुरुवार व शुक्रवारी गांधी चौकात येवून या आजाराच्या लक्षणांविषयी नागरिकांकडे विचारपूस केली. मात्र कोणालाही या आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, अशी माहिती सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.टापरे यांनी दिली.