ईटीआय मशीनचा वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:40 IST2021-03-01T04:40:13+5:302021-03-01T04:40:13+5:30
बुलडाण्यात रिपेअरिंग सेंटर असल्याने अनेक मशीन बुलडाणा आगरात दुरुस्तीसाठी येतात. नादुरुस्त ईटीआय मशीनमुळे वाहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत ...

ईटीआय मशीनचा वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप !
बुलडाण्यात रिपेअरिंग सेंटर असल्याने अनेक मशीन बुलडाणा आगरात दुरुस्तीसाठी येतात. नादुरुस्त ईटीआय मशीनमुळे वाहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी प्रशासन दोषी असल्याचे चारपानी पत्र लिहून नांदेड शहरातील या वाहकाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातीलच माहूर आगारातील एका बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे नादुरुस्त ईटीआय मशीनचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील सर्वच आगारामधील वाहक ईटीआय मशीनला वैतागले आहेत. ही मशीन केव्हा बंद होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे पुन्हा जुन्याच्या पद्धतीने तिकीट काढावे लागत असल्याचे दिसून येते.
रोज बिघडतात २५ मशीन
बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव या सात आगारांमध्ये दररोज २५ पेक्षा जास्त मशीन बिघडत आहेत. त्यातील प्रत्येक आगारातील आठ ते १० मशीन नादुरुस्त असून, जुन्याच्या पद्धतीने तिकीट द्यावे लागते.
तक्रार करण्यास वाहकांची टाळाटाळ
जिल्ह्यातील सातही आगारांतर्गत कार्यरत असलेल्या वाहकांना देण्यात आलेल्या ईटीआय मशीन प्रवासादरम्यान बंद पडण्याचे अनेक प्रकार गेल्या वर्षभरात घडले आहेत. त्या-त्या आगारात यासंबंधीच्या तक्रारी करण्यास वाहक समोर येत नाहीत. आगार प्रमुखाला याची कल्पना असली, तरी हा प्रकार अद्याप सुरूच आहे.
प्रवासादरम्यान तिकीट वितरित करीत असतानाच ईटीआय मशीन बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशावेळी वाहकांना नाईलाजास्तव कागदावर प्रवासाकरिता आकारलेले पैसे लिहून द्यावे लागतात; मात्र ही पद्धत नियमबाह्य असून तपासणी पथक ही अडचण समजून घेत नसल्याचे काही वाहकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात ८० पेक्षा अधिक ईटीआय मशीन नादुरुस्त असल्याची माहिती आहे.
वाहक म्हणतात.....
ईटीइाय मशीन नादुरुस्त असल्याचे वाहकांकडूनही सांगण्यात येते. परंतु तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नाही. पूर्वी ‘ट्रे’च्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे दिली जायची. ही पद्धत मोडित काढून काही वर्षांपासून ईटीआय मशीनद्वारे तिकिटे देण्याची पद्धत अमलात आणण्यात आली.
चार्जिंग न होणे, नादुरुस्तीमुळे कधी तिकिटाची प्रिंट न निघणे, प्रवासादरम्यान १० ते १५ मिनिटे मशीन हँग होणे यांसह इतरही स्वरूपातील अडचणी ईटीआय मशीनमध्ये जाणवत असल्याची माहिती एका वाहकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तिकिटांमध्ये गोंधळ झाल्याची भीती असते.
बुलडाणा एस. टी. आगाराला १९२ ईटीआय मशीन मिळालेल्या आहेत. त्यातील एकही मशीन नादुरुस्त नाही. बुलडाणा येथेच रिपेअरिंग सेंटर आहे. याठिकाणी दोन कर्मचारी सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे मशीन नादुरुस्त झाल्यास तातडीने त्याची दुरुस्ती करण्यात येते. इतर आगारातील मशीनही आपल्याकडे दुरुस्तीसाठी येतात. दररोज मशीन नादुरुस्त होत नाहीत.
- दीपक सावळे, आगार प्रमुख, बुलडाणा.
प्रवासी आमचे दैवत, प्रवाशांचे ध्येय हेच आमचे समाधान या ब्रीद वाक्याचा विसर एसटी महामंडळाला पडत आहे. प्रवाशांना योग्य सुविधा देण्यात एसटी महामंडळ कमी पडत असल्याने त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांना राज्य एस. टी. परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना तिकिटे देण्याकरिता ईटीआय मशीन देण्यात आलेल्या आहेत. यामुळे निश्चितपणे वाहकांची सोय झाली; परंतु अनेक मशीनमध्ये बिघाड निर्माण होत आहे. प्रवासादरम्यान मशीन हॅंग होण्याचे प्रकारही घडत आहेत.
- शेख उस्मान,
अध्यक्ष, प्रवासी सेवा संघटना.