जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 26, 2023 17:03 IST2023-07-26T17:03:06+5:302023-07-26T17:03:37+5:30
सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
बुलढाणा : जिल्ह्यातील दोन हजार ग्रामीण व शहरी भागातील आशा व गटप्रवर्तकांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी २६ जुलै रोजी तालुकास्तरावर केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन केले. सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आशा व गटप्रवर्तकांनी घरोघरी जाऊन लाखो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी काम केले. त्यामध्ये देशातील शेकडो आशा सेविका ह्या मृत्युमुखी पडल्या. त्यांना कुठलाही मोबदला या सरकारने दिला नाही. एवढेच नव्हे, तर गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही वाढ केंद्र सरकारने त्यांच्या मानधनात केली नाही. एकीकडे प्रचंड महागाई वाढत असताना आशा सेविकेला मानधन वाढ द्यायला सरकारजवळ पैसा नाही. विविध योजनेत काम करणाऱ्या महिलांना जगण्याइतकेही मानधन हे सरकार देत नसल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी सरकारवर केला.
केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करून त्यांना किमान २६ हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारकडे करण्यात आली. तसेच मणिपूर येथे आदिवासी महिलांची धिंड काढून त्यांच्यावर जो अत्याचार करण्यात आला, या घटनेचासुद्धा संघटनेकडून निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, ललिता बोदडे, जयश्री तायडे, सिंधू अवसरमोल, सुरेखा पवार, कविता चव्हाण, शारदा लिंगायत, गारमोडे, ललिता साळवे, सुमित्रा लिहिणार आदींनी केले.