व्यसनामुळे घराबाहेर जा म्हटल्याने वडिलाने केला मुलाचा खून, बंद दाराआड थरार
By सदानंद सिरसाट | Updated: March 14, 2024 19:30 IST2024-03-14T19:29:53+5:302024-03-14T19:30:21+5:30
जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव बाजार येथे जिगाव येथील रहिवासी असलेले कुटुंब वास्तव्यास आहे.

व्यसनामुळे घराबाहेर जा म्हटल्याने वडिलाने केला मुलाचा खून, बंद दाराआड थरार
जळगाव जामोद (बुलढाणा): व्यसनाधीन वडिलांना घर सोडून जा म्हणणाऱ्या तरुण मुलावर दारुड्या वडिलांनीच कुऱ्हाडीचे वार करत संपवल्याची घटना तालुक्यातील आसलगाव बाजार येथे १३ मार्च रोजी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच गुन्ह्याचा छडा लावत आरोपी वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे (६८) याला अटक केली.
जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव बाजार येथे जिगाव येथील कुटुंब वास्तव्यास आहे. त्यातील आरोपी सातत्याने दुकानात जाऊन दारू पित होता. त्यामुळे आपल्याला समाजात अपमानित व्हावे लागते. तसेच घरातील सर्वांनाच मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याने मुलगा शिवाजी प्रल्हाद रायपुरे (३६) याने वडिलांना खडसावले. तसेच घर सोडून जाण्याचे सांगितले. त्यानुसार आरोपी प्रल्हाद रायपुरे हा कापडाची पिशवी घेऊन घराबाहेर गेला. त्यानंतर बुधवारी रात्री १ वाजेच्या दरम्यान गाढ झोपेत असलेला मुलगा शिवाजीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले.
त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळीच उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठविण्यात आले. घटनेचा पंचनामा करीत असतानाच पोलिसांनी घटनेबद्दल सखोल विचारपूस केली. त्यामध्ये मृताचे वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे याने खुनाची कबुली दिली. त्यामुळे खुनाचा तपास पोलिसांनी काही तासांच्या आतच छडा लावला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पीएसआय येवले करीत आहेत.