पाकिट चोरणाऱ्या महिलेला पाठलाग करून पकडले; महिला पोलिसांचे प्रसंगावधान
By अनिल गवई | Updated: April 3, 2024 18:28 IST2024-04-03T18:27:57+5:302024-04-03T18:28:01+5:30
स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढताना एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या पर्समधील पाकीट लंपास करण्यात आले.

पाकिट चोरणाऱ्या महिलेला पाठलाग करून पकडले; महिला पोलिसांचे प्रसंगावधान
खामगाव: स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढताना एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या पर्समधील पाकीट लंपास करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार वेळीच लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने आरडाओरडा केला. त्यावेळी कर्तव्यावरील महिला पोलिसाने पाठलाग करून आरोपी महिलेस पकडले.
तक्रारीनुसार, एमआयडीसी, सुटाळा बु. भागातील गौरा नगरात राहणाऱ्या गीता अनंत शेगोकार (५८) कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या. बसमध्ये चढत असताना गर्दीत संधी साधत एका चोरट्या महिलेने एटीएम, पॅन, आधार कार्ड आणि रोख ३८०० रूपये असलेले पाकीट अलगद काढून घेतले. हा प्रकार शेगोकार यांच्या तत्काळ लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा केला असता सोनी मंगेश भोसले (४०, रा. राहटगाव जि. संभाजीनगर) ही महिला पळून जात होती. या घटनेची माहिती मिळताच बसस्थानक चौकीवर कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस दिव्या काळे यांनी धावपळ करीत, काही प्रवाशांच्या मदतीने चोरट्या महिलेस पकडले. तिच्या जवळून चोरी केलेले पाकीट हस्तगत केले. याप्रकरणी चोरट्या महिले विरोधात भादंवि कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.