मलकापुरातील सशस्त्र हाणामारीप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोन्ही गटांतील १३ जणांना अटक
By सदानंद सिरसाट | Updated: April 20, 2023 16:15 IST2023-04-20T16:14:20+5:302023-04-20T16:15:07+5:30
हल्ल्यात गंभीर जखमी दोघांची तब्येत अत्यवस्थ आहे.

मलकापुरातील सशस्त्र हाणामारीप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोन्ही गटांतील १३ जणांना अटक
मलकापूर : येथील ताजनगरातील सशस्त्र हाणामारीप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून तब्बल २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दोन्ही गटांतील १३ जणांना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी दोघांची तब्येत अत्यवस्थ आहे.
विजेच्या खांबावरून पारपेठ प्रभागातील ताजनगरात बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शेजारी दोन गटांत वाद उफाळून आला. नंतर शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. एका गटाच्या वतीने दुसऱ्या गटातील लोकांवर चाकूने हल्ला चढवला. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी,राजमोहम्मद अ.रशिद (रा.ताजनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शाहरुखखान मुनिरखान, जावेदखान मुनिरखान, मुनिरखान नूरखान, हमीदखान मेहमूदखान, अक्रमखान मुनिरखान, कलीमखान असलमखान अशा सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चौघांना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके करीत आहेत.
विरोधी गटाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अ.रज्जाक अ.समद,अ.साबीर अ.रज्जाक, राजमोहम्मद अ.रशिद, अ.कलीम अ.समद, अ.युसूफ अ.रशिद, अ.हनिफ अ.हजीज, शे.मोबीन शे.नबू,अ.आसीफ अ.रज्जाक, अ.अलीम अ.कलीम व इतर ५ अशा १४ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एकूण ९ जणांना अटक करून पोलिसांनी गजाआड केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर करीत आहेत. पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी लक्ष घालून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गंभीर जखमी दोघे अत्यवस्थच!
ताजनगरातील सशस्त्र वाटमारीत पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी मोहम्मद आरिफ अ.रज्जाक व मोहम्मद शरीफ अ.रज्जाक अशा दोघांनाही अकोला येथे हलविण्यात आले. त्यांची तब्येत अत्यवस्थच आहे. त्यांच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.