समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात; तिघे जखमी, विझोरा शिवारातील घटना
By निलेश जोशी | Updated: December 15, 2022 19:22 IST2022-12-15T19:21:48+5:302022-12-15T19:22:09+5:30
समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात; तिघे जखमी, विझोरा शिवारातील घटना
सिंदखेडराजा (बुलढाणा) : शिर्डीहून अमरावतीकडे परतणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावरील विझोरा शिवारात अपघात झाला असून कारमधील पती,पत्नीसह त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अमरावती येथील सुमित गावंडे हे आपली पत्नी प्रियंका व ११ महिन्यांचा मुलगा वेद हे शिर्डीहून कारद्वारे (क्र. एमएच-२७-डीए-४१०४) अमरावतीकडे परत येत होते. विझोरा शिवारात गावंडे यांचा गाडीवरील ताबा सुटला वत्यांची कार समृद्धीच्या चॅनल नंबर ३२६.९ व जाऊन आदळली.
सुदैवाने कारमधील एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली. मात्र कारमधील तिघांना जबर दुखापत झाली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील रूग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या होत्या. परंतु दुखापत गंभीर नसल्याने गावंडे यांनी आपल्या नजीकच्या नातेवाइकांना बोलावून घेऊन त्यांचे सोबत ते मेहकरकडे गेले. अपघातग्रस्त कार घटनास्थळी असून महामार्ग पोलिस निरीक्षक शैलेश पवार, गणेश सुसर, विठ्ठल काळूसे, शेख रोशन, गणेश उबाळे, संदीप शिर्के यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.