गर्भवती महिलांना ९.५३ लाखांचे अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:17+5:302021-08-20T04:40:17+5:30
बुलडाणा: मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांना आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक निर्देशांक वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या ...

गर्भवती महिलांना ९.५३ लाखांचे अर्थसाहाय्य
बुलडाणा: मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांना आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक निर्देशांक वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांतर्गत कोरोना संसर्गामुळे बाधित झालेल्या गेल्या वर्षभरात २ हजार ३८४ गर्भवती व प्रसूत महिलांना ९ लाख ५३ हजार रुपयांचे बुडीत मजुरीच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा फटका मानव विकास कार्यक्रमाला जिल्ह्यात बसलेला आहे. यामुळे कोरोनाच्या काळात मानव विकास कार्यक्रमांतर्गतच्या अनेक योजना बंद होत्या. मात्र गर्भवती महिलांसाठी आरोग्यविषयक सुरू असलेला हा उपक्रम नियमित स्वरूपात सुरू होता. त्यामुळे एैन अडचणीच्या काळात मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील गर्भवती व प्रसूत झालेल्या महिलांना याचा लाभ झाला.
मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रात उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात येते. हे निर्देशांक वाढविण्यासाठी संबंधित क्षेत्रात विविध सुविधा, सामाजिक स्तरावर उत्पन्नाचे स्रोत वाढविणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांतर्गत आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात प्रयत्न करण्यात येत आहेत.
प्रामुख्याने महिला आरोग्याला त्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे.
या सातही तालुक्यात गर्भवती महिला प्रसूतीनंतर लगेच कामावर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. कौटुंबिक अडचणीमुळे महिलांना नाइलाजाने मजुरी बुडते म्हणून व गरज असल्याने प्रसूत झालेल्या महिला अल्पावधीतच कामावर जातात. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यसह अर्भकावरही होतो. सोबतच या महिलांना योग्य आराम प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर मिळत नाही. परिणामी या तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्रसूतीनंतर लगेच कामावार न जाता त्यांना आराम मिळावा म्हणून प्रसूतीदरम्यानच्या कालावधीसाठी बुडीत मजुरी दिल्या जाते. साधारणत: नव्या महिन्यात ही रक्कम या महिलांच्या खात्यात जमा करण्यात येते. त्यानुषंगाने गेल्या वर्षात या सात तालुक्यातील अशा २ हजार ३८४ महिलांच्या खात्यात प्रत्येकी ४ हजार रुपयांची बुडीत मजुरी जमा करण्यात आली आहे. त्याची रक्कम जवळपास ९ लाख ५३ हजारांच्या घरात जाते.
--महिन्याकाठी होते आरोग्य तपासणी--
महिन्याकाठी ग्रामीण भागात दोन व शहरी भागात महिन्याला एक याप्रमाणे आराेग्य तपासणी शिबिर घेण्यात येऊन अशा गर्भवती व प्रसूत झालेल्या महिलांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येते. यामध्ये हायरिस्क झोनमधील गर्भवती महिला व प्रसूत महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून त्यांच्यावर अैाषधोपचार केल्या जातो. त्यातून या महिलांचे आरोग्य संवर्धन होण्यास मदत मिळते.
--दरवर्षी ५७६ बालकांचा मृत्यू--
जिल्ह्यात दरवर्षी ५७६ बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी या माध्यमातून प्राधान्य देण्यात येते. उपजत मृत्यूचेही प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळे या योजनेची मानव विकास कार्यक्रमातंर्गत अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी, अशीही मागणी होत आहे. आरोग्य शिबिरामध्ये हायरिस्क माता, कमी वजनाची बालके यांचीही माहिती संकलित केल्या जाते.