६0 टक्के भावी शिक्षकांमध्ये निरुत्साह
By Admin | Updated: November 22, 2014 01:21 IST2014-11-22T01:21:14+5:302014-11-22T01:21:14+5:30
टीईटीला प्रतिसाद नाही : राज्यातील ५ लाखाच्यावर डीटीएड्धारक बेरोजगार.

६0 टक्के भावी शिक्षकांमध्ये निरुत्साह
ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)
राज्यात सध्या जवळपास ५ लाखाच्यावर डीटीएड् धारक बेरोजगार आहेत. त्यांच्याकरीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सन २0१३ पासून टीईटी परीक्षा घेण्यात येत असून, यावर्षी राज्यातील ६0 टक्के भाविशिक्षकांमध्ये टीईटी परीक्षेसाठी निरूत्साह दिसून येत आहे. दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांंची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे. गत काही वर्षात राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त अध्यापक विद्यालयांना मान्यता मिळाल्याने विषम परिस्थि ती निर्माण झाली आहे. सन २00५ ते २0१३ या नऊ वर्षाच्या शैक्षणिक सत्रात राज्यातील आठ विभागांतर्गत १ हजार ४0५ अध्यापक विद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून, भावी शिक्षकांचा लोंढा बाहेर पडत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी देणे शक्य नसल्याने शासनाने सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा लागू केली. सन २0१0 मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८00 विद्यार्थ्यांंनी सीईटी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आली. त्यामध्ये उर्वरीत ७0 हजार ७८८ भावी शिक्षक नोकरीपासून वंचीत राहिले. राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दज्रेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भाविशिक्षकांची पुन्हा चाळणी करण्यास सुरूवात केली. शिक्षक होण्यासाठी केवळ सीईटी परीक्षाच उत्तीर्ण होणे बाकी नसून; त्यासाठी टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा सन २0१३ पासून घेण्यात येते. गतवर्षी सुमारे ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांंनी टीईटी परीक्षा दिली होती. परंतू, त्यामध्ये तब्बल ९५ टक्के उमेदवार नापास झाले होते. त्यानंतर यावर्षी पुन्हा १४ डिसेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा राज्यातून ३ लाख ८५ हजार भाविशिक्षक देणार आहेत. परंतू, डिसेंबरमध्ये घेण्या त येणार्या या टीईटी परीक्षेसाठी राज्याभरातून उमेदवारांची संख्या वाढण्याऐवजी तब्बल ६0 टक्क्यांनी घटली आहे. बेरोजगारांच्या तुलनेत शिक्षक भरतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने, दरवर्षी अध्यापक पदवीका घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी बेरोजगारीच्या खाईत ढकलले जात आहेत. सद्यस्थितीत राज्यात जवळपास ५ लाखाच्यावर डीटीएड् धारक बेरोजगारीच्या जाळ्यात अडकले आहेत.