सहा वर्षात ८०३ महिलांची रुग्णवाहिकेत प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:53 IST2020-02-24T14:53:05+5:302020-02-24T14:53:15+5:30
गेल्या सहा वर्षात प्रसुती कळा सुरू झालेल्या ८०३ महिलांची सुखरूपपणे रुग्णवाहिकेतच प्रसुती करण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.

सहा वर्षात ८०३ महिलांची रुग्णवाहिकेत प्रसूती
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बसमध्ये रस्त्यावर महिलेची प्रसुती झाल्याचे नेहमीच ऐकिवात असते. मात्र राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्यापासून गर्भवती महिलांनाही रुग्णालयात नेण्यासाठी एक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यातंर्गत माहिती घेतली असता बुलडाणा जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात प्रसुती कळा सुरू झालेल्या ८०३ महिलांची सुखरूपपणे रुग्णवाहिकेतच प्रसुती करण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २३ च्या आसपास १०८ रुग्णवाहिका आपतकालीन स्थितीसह, रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सेवा देत आहेत. त्यातंर्गत प्रसुती कळा सुरू झालेल्या महिलांना रुग्णालयात नेताना महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. विशेष म्हणजे अॅडव्हॉन्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाईफ सपोर्ट सुविधाही जिल्ह्यातील १०८ रुग्णावाहिकांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच एक डॉक्टरही रुग्णवाहिकेत उपलब्ध असल्याने माता व अर्भकांचे प्रसुतीदरम्यान आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. या १०८ रुग्ण वाहिकेद्वारे एकूण १२ प्रकारच्या सुविधा या रुग्णांना पुरविल्या जात आहे. त्यापैकी ही एक सुविधा आहे. बुलडाणा जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांचा विचार करता रुग्णांना ‘रेफर टू औरंगाबाद किंवा रेफर टू अकोला’ असेच काहीसे सुत्र बनललेले आहे. यात प्रसंगी गर्भवती व प्रसुती कळा सुरू झालेल्या क्रिटीकल महिलांनाही बऱ्याचदा अन्यत्र रेफर करावे लागले आहे.
२०१४ पासून सुविधा
बुलडाणा जिल्ह्यात २०१४ पासून १०८ रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाली आहे. तेव्हापासून अजापर्यंत ८०३ महिलांची रुग्णवाहिकांमध्येच प्रसुती झाली आहे. यामध्ये २०१४ मध्ये ६९, २०१५ मध्ये १२८, २०१६ मध्ये १६७, २०१७ मध्ये १७०, २०१८ मध्ये १५८, २०१९ मध्ये १०७ आणि २०२० मध्ये ४ महिलांची रुग्णालयात नेत असताना रुग्ण वाहिकेतच प्रसुती झाली आहे. मात्र रुग्णावाहिकेतच बेसीक लाइफ सपोर्ट सुविधा उपलब्ध असल्याने माता व अर्भकांना वेळेत रुग्णावाहिकेतच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
रुग्णावाहिकेत प्रशिक्षीत डॉक्टर, औषधे व तत्सम सुविधा उपलब्ध असल्याने प्रसुतीदरम्यान अडचणी गेल्या नाहीत. यामुळे सुविधांअभावी माता व अर्भकाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळाली आहे.
- डॉ. राजकुमार तायडे,
जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका, बुलडाणा