४५० गावं पाण्यापासून वंचित

By Admin | Updated: April 7, 2017 23:58 IST2017-04-07T23:58:35+5:302017-04-07T23:58:35+5:30

बुलडाणा : पाच वर्षांपासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश परिस्थितीच्या छायेत आहे. यामुळे शेतातील पिकांसह नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत आहे.

450 villages deprived of water | ४५० गावं पाण्यापासून वंचित

४५० गावं पाण्यापासून वंचित

जिल्हा सांख्यिकी अहवाल : पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सुविधा नाही!
बुलडाणा : पाच वर्षांपासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश परिस्थितीच्या छायेत आहे. यामुळे शेतातील पिकांसह नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात १४४४ गावे असताना, यापैकी केवळ ९८९ गावांत पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा असून, उर्वरित ४५० गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याची बाब जिल्हा सांख्यिकी अहवालातून पुढे आली आहे.
काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प झाले असून, शहरासह बऱ्याच ग्रामीण भागात पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. आजरोजी जिल्ह्यात २८७ गट ग्रामपंचायत व ५८० स्वतंत्र्य ग्रामपंचायती कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतींमधून कार्यरत पाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील ९८९ गावांना पिण्याचे पाणी पुरविल्या जात आहे. शिवाय उपलब्ध पाण्यातून इतर गरजाही पूर्ण करण्यात येतात. मात्र, असे असतानाही बरेच गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत.
जिल्हा सांख्यिकी अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण १४४४ गावांपैकी ९८९ गावांत पिण्याच्या पाण्याची उपाययोजना आहे, तर उर्वरित ४५० गावांत पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहीर, हातपंप, नदी आदी पाणी स्रोताचा पाण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे. आज पाणीटंचाईमुळे बऱ्याच गावांचे पाणी स्रोत प्रभावित झाले आहेत.
अनेक गावांतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागातील स्थिती भयंकर असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार आहे.

६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई
यंदा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला, मात्र आॅक्टोबर २०१६ नंतर पावसाने पाठ फिरवली, शिवाय पाण्याचा वापरही वाढला. यामुळे उन्हाळा सुरु होण्याआधीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ साठी तयार केलेला पाणीटंचाई निवारण आराखड्यानुसार जिल्ह्यात ६५० गावांत संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहे.

चार गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा
उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट जाणवायला सुरुवात झाली असून, चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे यावर्षीही पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील चार गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामध्ये दे.राजा तालुक्यातील पाडळी शिंदे गावाचा समावेश आहे. तसेच खामगाव तालुक्यातील निरोड व शिराळा, सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी गावाचाही समावेश आहे. पाडळी शिंदे गावची लोकसंख्या २५०० असून, गावाकरिता २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेऱ्या मारणार आहे. निरोडच्या १७०९ लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेऱ्या मारणार आहे.
त्याचप्रमाणे शिराळा येथील १६०९ लोकसंख्येकरिता याच क्षमतेचा एक टँकर तीन फेऱ्या दिवसातून मारणार आहे. तसेच सोनोशी येथील ३९०० लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन फेऱ्या मारणार आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देऊन टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. तसेच ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी, टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: 450 villages deprived of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.