४0 हजार विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके
By Admin | Updated: May 30, 2014 23:44 IST2014-05-30T23:28:44+5:302014-05-30T23:44:00+5:30
खामगाव पंचायत समिती अंतर्गत ४0 हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळणार आहे.

४0 हजार विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके
खामगाव: शैक्षणिक सत्र २0१४-१५ येत्या २६ जूनपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठय़पुस्तके उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून तयारी सुरु झाली आहे. यानुसार खामगाव पंचायत समिती अंतर्गत ४0 हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठय़पुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषद नगर परिषद, खाजगी अनुदानीत शासकीय शाळा तसेच अनुदानीत आश्रम शाळांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील २0६ शाळांना मोफत पुस्तके मिळणार आहेत. मराठी, उर्दू, हिंदी व सेमी इंग्रजी या चारही माध्यमाची वर्ग १ ते ८ करिता पुस्तके प्राप्त होणार आहेत. खामगाव तालुक्यात मराठी माध्यमाचे ३२ हजार ८४९ विद्यार्थी तर उर्दू माध्यम ५ हजार ९५८, हिंदी माध्यम ५९९ विद्यार्थी तसेच सेमी इंग्रजी माध्यमाचे ३ हजार १३४ विद्यार्थी आहेत. इयत्ता १ ली व २ रीची बालभारती, गणित, इंग्रजी या तीनच विषयाची पुस्तके आली आहेत. तर वर्ग ३,४ व ५ वीच्या कोणत्याच विषयाची पुस्तके प्राप्त झाली नाहीत. वर्ग ७ वीचे भूगोल विषय वगळता सर्व पुस्तके मिळाली आहेत. वर्ग ८ वीचे उर्दू व हिंदी माध्यमाची पुस्तके आली मात्र मराठीचे एकही पुस्तक आलेले नाही. यावर्षी इयत्ता ३ री व ४ थीचा नवीन अभ्यासक्रम असल्याने पुस्तके प्राप्त नसल्याची माहिती आहे. आलेल्या सर्व पुस्तकांचे थेट शालेय स्तरावर वाटप सुरु आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळेत ही पुस्तके वितरीत केल्या जाणार आहेत.