मृत जनावरांची संख्या ३00
By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:04:20+5:302014-07-28T00:13:32+5:30
खामगाव महसूल विभागाचे दुर्लक्ष : पशुवैद्यकीय पथकाकडून युद्धपातळीवर तपासणी.

मृत जनावरांची संख्या ३00
खामगाव : खामगाव तालुक्यासह शेगाव तालुक्यातील शेकडो जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, मृत जनावरांचा आकडा ३00 पेक्षा जास्त असल्याची शक्यता आहे. गुरुवारपासून जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच असून, आतापर्यंत खामगाव तालुक्यातील २३0 च्या वर जनावरे दगावली आहेत. त्याचप्रमाणे शेगाव तालुक्यातील ६५ जनावरे दगावल्याची माहिती आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील पशुपालक कमालीचे धास्तावले आहेत.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे आतापर्यंत १४0 च्यावर जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामध्ये शुक्रवारी शंभरावर जनावरे दगावली होती. शनिवारी १५ तर आज रविवारी ६ जनावरे दगावली आहेत. त्यापाठोपाठ तालुक्यातील पोरज, मांडणी, कोन्टी, गेरू या ठिकाणीही जनावरे दगावण्याचे लोण पसरले आहे. खामगाव तालुक्यासह शेगाव तालुक्यातील जलंब, माटरगाव, मच्छिंद्रखेड, निंबी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जनावरे दगावली आहेत. शेगाव तालुक्यात ६0 च्यावर जनावरे दगावली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर येणार्या काही दिवसात जंगल परिसरात मृत जनावरांचा आकडा वाढू शकतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असून, मृत जनावरांचे सर्वेक्षण पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. शेगाव तालुक्यात तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.एन. इंगळे यांना परिस्थिती हाताळण्यासाठी निर्देश दिले असून, मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना, सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
महसूल प्रशासन झोपेत!
खामगाव तालुका आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात जनावरे दगावली असल्याचे वास्तव आहे. पशुसंवर्धन विभागाने सर्व्हेक्षण करून मृत जनावरांचे शवविच्छेदनही केले आहे. मात्र, अद्यापपर्यंत महसूल प्रशासनाच्यावतीने या संदर्भात कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे. घटनेला तीन-चार दिवस लोटल्यानंतरही महसूल प्रशासन अद्यापपर्यंत कोणत्याही गावात पोहोचले नसल्याची वस्तुस्थिती आहे. खामगाव तालुक्यातील एकट्या हिवरखेड या गावात एकाच शेतकर्याची ५९ जनावरे मृत्युमुखी पडली असून, या गावातील तब्बल १४१ च्यावर जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यासोबतच मांडणी, कोन्टी, गेरू, पोरज आदी गावेही बाधित झाली आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडे यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
*गावनिहाय मृत्युमुखी पडलेली जनावरे
हिवरखेड ता. खामगाव १४१
मांडणी, ता. खामगाव ३0
कोन्टी, ता. खामगाव २0
गेरू, ता. खामगाव १५
पोरज, ता. खामगाव १५
माक्ता, ता. खामगाव ५
माटरगाव, ता. शेगाव ३५
जलंब, ता. शेगाव १५
मच्छिंद्रखेड, ता. शेगाव १0
निंबी, ता. शेगाव ५