बुलढाण्यात लाडक्या बहि‍णींनी पैसे नाकारले, २९ महिलांनी सोडला योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:00 IST2025-02-04T16:00:31+5:302025-02-04T16:00:54+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २९ महिलांनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे अर्ज केला आहे.

29 women in buldhana leave benefit of cm ladaki bahin yojana | बुलढाण्यात लाडक्या बहि‍णींनी पैसे नाकारले, २९ महिलांनी सोडला योजनेचा लाभ

बुलढाण्यात लाडक्या बहि‍णींनी पैसे नाकारले, २९ महिलांनी सोडला योजनेचा लाभ

बुलढाणा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पडताळणी होणार असल्याने धास्ती घेऊन काही बहिणींनी पैसे नाकारणारे अर्ज भरणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९ महिलांनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे अर्ज केला आहे.

महिला बालविकास व विभागाकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी लवकरच सुरू होणार असून, अपात्र ठरणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी स्वतः अर्ज करून योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लाडकी बहीणचे ६.४१ लाख लाभार्थी !
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'माझी लाडकी बहीण' योजनेतून जिल्ह्यात जवळपास ६ लाख ४१ हजार ८५४ महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, काही महिलांना अपात्र ठरण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी लाभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा!
पात्र महिलांना योजनेचे आतापर्यंत २ हप्ते मिळाले आहेत. फेब्रुवारीतील दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

कोण होणार अपात्र?
राज्य शासनाने या योजनेसाठी काही ठराविक अटी व निकष लागू केले आहेत. त्यानुसार, नोकरी करणाऱ्या, कर भरत असलेल्या किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभघेणाऱ्या महिला अपात्र ठरू शकतात; तसेच अडीच लाख पेक्षा, अधिक उत्पन्न, चारचाकी वाहन असल्यास, एका कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेत असल्यास अशा महिला योजनेतून अपात्र ठरणार आहेत. तथापि, याबाबत अद्याप स्पष्ट सूचना नसल्याने पडताळणी मोहीम सुरु झाली नसल्याची दिसून येत आहे. मात्र, याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

लाभ सोडण्यासाठी कोठे कराल अर्ज?
जे लाभार्थी या योजनेतून बाहेर पडू इच्छितात, त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अंगणवाडी कर्मचारी अथवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा.

लाभार्थ्यांची तपासणी सुरू होणार असल्याने काही महिलांनी अर्ज करून लाभ नाकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांना लाभमिळणे सुरूच राहील.
- प्रमोद एंडोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: 29 women in buldhana leave benefit of cm ladaki bahin yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.