२८८ ग्रामपंचायतींचे कारभारी आज ठरणार
By Admin | Updated: September 9, 2015 01:53 IST2015-09-09T01:53:38+5:302015-09-09T01:53:38+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील उर्वरीत २२८ सरपंचपदासाठी निवडणूक; प्रशासन सज्ज.

२८८ ग्रामपंचायतींचे कारभारी आज ठरणार
बुलडाणा : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निवडणूक झालेल्या २२८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक ३१ ऑगस्ट रोजी झाली होती. तर उर्वरित २८८ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. जिल्हय़ातील ५२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यामध्ये ऑगस्टमध्ये मुदत संपणार्या २२८, सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्या २८८ तर ऑक्टोबरमध्ये मुदत संपणार्या ५ ग्रा.पं.चा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यातील सरपंचपदाच्या निवडणुका ३१ ऑगस्टला तर उर्वरित २८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ९ सप्टेंबरला होऊ घातल्या आहेत; तसेच संग्रामपूर तालुक्यातील ३ सरपंचांची निवडणूक २२ सप्टेंबरला तर खामगाव तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींची निवडणूक ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी तहसील पातळीवर प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात यासाठी विशेष सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अध्यासी अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, सहलीवर गेलेले ग्रामपंचायत सदस्य परतीच्या मार्गावर असून, सरपंचपदासाठी त्यांनी तडजोडी केल्या आहेत. मलकापूर तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे. त्यात नरवेल, दसरखेड, विवरा, तिघ्रा, चिखली, भानगुरा, दुधलगाव खुर्द, शिराढोण, लासुरा, लोणवडी, जांबुळधाबा, हरणखेड, खामखेड, माकनेर, वडोदा, हिंगणाकाझी, कुंड खुर्द, निंबारी व घिर्णी ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर संग्रामपूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. यापैकी ११ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव आहे. सकाळी १0 ते ११ अर्ज घेणे, दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात होऊन २.१0 वा. अर्जांंची छाननी, २.२0 वा. मागे घेण्याची वेळ आणि त्यानंतर हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाणार आहे.