बुलडाणा जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:22 IST2021-03-20T11:22:29+5:302021-03-20T11:22:38+5:30
loan waiver benefits आधार प्रमाणीकरण रखडले असल्याने त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेपासून बुलडाणा जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी अद्यापही वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी ५,३०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले असल्याने त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यापासून खरीप पीककर्जाचे वाटप शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट असतानाही शेतकरी कर्जमाफीमुळे अनेक बँकांनी शेतकऱ्यांना सढळ हाताने पीककर्ज वाटप केले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील महत्तम, असे ५४ टक्के पीककर्ज वाटप केले गेले होते. त्यामुळे आगामी खरीप हंगामामध्ये किती शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होते, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना १ हजार १२१ कोटी ४० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही. जवळपास ५,३०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. त्यामुळे ते मार्गी लावण्याची आता गरज निर्माण झाली आहे. यासोबतच १९ हजार ७०० शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांकच न आल्यामुळे त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
एकीकडे शेतकऱ्यांना गरजेनुरूप पीककर्ज वाटप करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या कर्जमाफी योजनेचा लाभच जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे येत्या हंगामात ते प्रसंगी पीककर्जापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.