भानखेडमध्ये २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 21:19 IST2021-01-23T21:19:01+5:302021-01-23T21:19:23+5:30
Buldhana District News जनार्दन इंगळे यांच्या सुमारे २०० देशी कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्या आहेत.

भानखेडमध्ये २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू!
चिखली : येथून जवळच असलेल्या भानखेड शिवारात जनार्दन इंगळे यांच्या सुमारे २०० देशी कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावत असल्याने चिंतेत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये या घटनेने धास्ती पसरली आहे.
भानखेड येथील शेतकरी जनार्दन इंगळे यांनी आपल्या शेतात सुमारे २०० देशी कोंबड्यांचे पालन चालविले होते. २३ जानेवारी सकाळी या कोंबड्या अचानकपणे मृत्युमुखी पडल्या आहेत. यासह याच गावांतील इतरही नागरिकांची एक -दोन याप्रमाणेदेखील कोंबड्या दगावल्या आहेत. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच चिखली तालुका पशुधन अधिकारी डॉ. दांडगे, पशुवैद्यकीय लघु चिकित्सालयाचे डॉ. युवराज रगतवान, पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रवीण निळे, व डॉ. पूनम तायडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी काही कोंबड्यांचे सॅम्पल अकोला येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. तर उर्वरित कोंबड्यांची जमिनीत खड्डा खोदून योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यात आली आहे. डॉ. युवराज रगतवान यांनी पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व गावकरी उपस्थित होते.
मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यांपैकी तीन कोंबड्यांचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच नेमके कारण समजू शकेल. तत्पूर्वी खबरदारीच्या उपाययोजनेबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे. पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात कळवावे.
- डॉ. शशिकांत दांडगे, पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी