११७ पाणीपुरवठा याेजनांना महावितरणचा शाॅक, देयके थकल्याने वीज पुरवठा केला खंडित
By संदीप वानखेडे | Updated: March 28, 2023 17:52 IST2023-03-28T17:52:37+5:302023-03-28T17:52:56+5:30
माेठ्या प्रमाणात देयके थकल्याने महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

११७ पाणीपुरवठा याेजनांना महावितरणचा शाॅक, देयके थकल्याने वीज पुरवठा केला खंडित
बुलढाणा : माेठ्या प्रमाणात देयके थकल्याने महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकीत देयके वसुलीसाठी आता विशेष अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ हजार ४१० पाणीपुरवठा याेजनांचे तब्बल ८८.९९ काेटींची देयके थकली आहेत. त्यामुळे, महावितरणने २७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ११७ पाणीपुरवठा याेजनांचा वीज पुरवठा खंडित केल्याने या गावांमध्ये वाढत्या तापमानात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
कृषी पंपासह पाणीपुरवठा याेजना व इतर ग्राहकांनी माेठ्या प्रमाणात देयके थकविल्याने जवळपास दाेन हजार काेटींच्यावर महावितरणची थकबाकी गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण संकटात सापडले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष माेहीम सुरू केली आहे. महावितरणने आता पथदिवे आणि पाणीपुरवठा याेजनांची देयके थकविणाऱ्या ग्रामपंचायतींकडे लक्ष केेंद्रित केले आहे. जिल्हाभरात १ हजार ४१० पाणीपुरवठा याेजनांची देयके थकली आहेत.
या याेजनांच्या देयकापाेटी महावितरणचे ८८.९९ काेटी रुपये थकीत आहेत. वारंवार मागणीपत्र देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा याेजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार २७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ११७ पाणीपुरवठा याेजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान माेठ्या प्रमाणात वाढत असतानाच या गावातील ग्रामस्थांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.