जागतिक जलदिन विशेष; बिन पानी सब सुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 07:00 IST2020-03-22T07:00:00+5:302020-03-22T07:00:02+5:30
पाण्याचा एकही थेंब आम्ही वाया घालवणार नाही, अशी शपथ घ्यायचा हवी.

जागतिक जलदिन विशेष; बिन पानी सब सुन
सविता देव हरकरे
रहिमन यांचा एक फार चांगला दोहा आहे.
ते म्हणतात,
रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सुन
पानी गये न उबरै, मोती मानुस चुन
आज पाणी हा अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे. पावसाचा तुटवडा वाढत असताना जलसंचयनाबाबत अजूनही आम्ही नको तेवढं उदासिन आहोत. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण आम्ही पैसे बचतीचा विचार करताना हमखास वापरतो. पण ज्या पाण्याचा यात उल्लेख आहे त्याकडं मात्र पद्धतशीर डोळेझाक केली जाते. असं म्हटलं जातय की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते नक्कीच पाण्यावरुन होणार. एवढं पाण्याचा संकट गहिरं होत चाललय. धरणे, नद्यांमधील पाण्यासाठी देशादेशांमध्ये,राज्याराज्यात,शहराशहरात आणि अगदी गावागावांमध्ये तंटे वाढत चाललेय. आक्राळविक्राळ लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तसेच विकासाच्या नावावर पृथ्वीवरील इतर नैसर्गिक स्रोतांप्रमाणेच पाण्याचा वापरही अमर्याद झाला आहे. त्यात पुन्हा जलप्रदूषणाची फार मोठी समस्या निर्माण झालीय. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी,रासायनिक द्रव्ये, घरगुती सांडपाणी, मैलापाणी अजूनही आम्ही नद्या,ओढे, नाल्यांच्या प्रवाहातच सोडतोय. कपडे, जनावरं,वाहनं याच पाण्यात धुतली जातात. या आणि अशा अनेक कारणांमुळं जलप्रदूषण प्रचंड वाढलय. नद्या-नाल्यांची अक्षरश: गटारं झालीत. वाढती लोकसंख्या तसेच उच्च राहणीमान,शिक्षण रोजगारासाठी गावांमधून शहराकडे लोकाचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतय. परिणामी शहरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे.
बदलत्या ऋतुचक्रामुळं पाऊसही आता कमी पडायला लागलाय. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दरवर्षीच दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. आताही राज्यातील १३ जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.
जलसमस्येवर मात करण्यासाठी शासनस्तरावर जलसंधारण, भूजलपुनर्भरण यासारख्या अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पण जलसंवर्धनासाठीची सर्वात मोठी आणि प्रभावी उपाययोजना आहे ती जनजागरुकतेची. मग तो जलप्रदूषणाचा प्रश्न असो वा पाण्याच्या अमर्याद वापराचा. कारण याचा थेट संबंध येतो तो लोकांशीच.
अगदी छोट्याछोट्या गोष्टी असतात. घरात वाहता नळ ठेवू नये. पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करावा, वाहनं धुण्यासाठी धोधो पाणी वापरणं थांबविलं पाहिजे. वाहनं, धुणीभांडी यासाठी वापरलेलं पाणी परिसरातील व बागेतील झाडांना दिल्यास पाण्याची खूप मोठी बचत होऊ शकते.
गावातून वाहणाऱ्या नद्या,तलावं म्हणजे त्या गावाचा प्राणवायू असतो. पण आज आपण आपल्या चुकीच्या कृतीमुळं हा प्राणवायूच रोखून धरलाय. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे ती बदलण्यात प्रत्येकाचं सहकार्य आवश्यक आहे. विशेषत: साहित्यिक वर्ग या जलचळवळीत सहभागी झाला तर ही चळवळ अधिक प्रभावी ठरु शकते. पाण्याकडे केवळ तांत्रिकदृष्ट्या बघितलं जाऊ नये. मंगेश पाडगावकर, ना.धों. महानोर, बा.भ. बोरकर, ग.दि. माडगुळकर, सदानंद बोरकर यांच्या काव्यदृष्टीतूनही पाण्याचा विचार व्हावा. पाण्याविषयी भावनिक दृष्टीकोन बाळगून मानवी जीवनात त्याचं असलेलं महत्व, जपणुकीची जबाबदारी स्वीकारण्याची प्रवृत्ती सर्वांनीच बाळगली पाहिजे.
पृथ्वीवरील एकूण पाणीसाठ्यापैकी फक्त २.५ ते २.८ टक्के पाणीच खारे नाही. म्हणजे गोड आहे, जे पिता येऊ शकते. परंतु जल प्रदूषणासह इतर काही कारणांमुळे केवळ ०.३ टक्के पाणीच सजीव सृष्टीस पिण्यायोग्य आहे, असं म्हणता येईल. त्यामुळं प्रत्येकानंच पाण्याचा वापर हा स्वत:ची आणि इतरांचीही गरज ओळखून करणे आवश्यक आहे. जागतिक जल दिनाच्या माध्यमाने आमच्यापैकी प्रत्येकानंच तसा संकल्प करायला हवा. पाण्याचा एकही थेंब आम्ही वाया घालवणार नाही, अशी शपथ घ्यायचा हवी.
आज भारतासह साºया जगाला भेडसावत असलेली पाण्याची समस्या सोडविण्याची जबाबदारी ही काही केवळ शासनाची अथवा शास्त्रज्ञांची नाही. तर ती सामान्यांची सुद्धा आहे.