‘ती’ची व्यसनाधिनता आणि धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:44 IST2020-02-06T15:43:23+5:302020-02-06T15:44:25+5:30
आता स्त्रियांची प्रगती आणि विकासासोबतच बदलत्या काळात निर्माण झालेल्या तिच्या संदर्भातील इतर काही गंभीर प्रश्नांचाही उहापोह होणे आता गरजेचे झाले आहे.

‘ती’ची व्यसनाधिनता आणि धोका
सविता देव हरकरे
पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत जिथं महिलांचा जन्म अजूनही नकोसा मानला जातो, महिलांना मानसन्मान मिळावा, त्यांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे, त्यांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगानं राज्य आणि केंद्र सरकारतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही काही प्रमाणात दिसून येताहेत. परंतु असे दिवस साजरे करताना आता स्त्रियांची प्रगती आणि विकासासोबतच बदलत्या काळात निर्माण झालेल्या तिच्या संदर्भातील इतर काही गंभीर प्रश्नांचाही उहापोह होणे आता गरजेचे झाले आहे.
स्त्रियांनी आज स्वकर्तृत्वावर पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी सर्वच क्षेत्रे पादक्रांत केली आहेत. ती त्याच्या खांद्याला खांदा लावून सर्व कौटुंबिक,सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतेय. या देशात महिलांचा होणारा हा विकास खरोखरच अभिमानास्पद आहे. पण स्त्रियांची ही वाढती क्षितिजं, आत्मविश्वासानं सर्वत्र होणारा तिचा वावर याचं कौतुक करत असतानाच तिच्याकडून टाकल्या जाणाऱ्या एका घातकी पावलाकडं मात्र समाज आणि व्यवस्थेचं अजूनही गांभीर्यानं लक्ष गेलेलं नाही,असं वाटतं. त्यामुळंच कदाचित स्त्रियांमधील वाढती व्यसनाधिनता एक भीषण समस्या बनत चालली आहे. व्यसनाधिनतेनं भारतीय संस्कृतीचा ज्या वेगानं ºहास होतोय त्यात दुर्दैवानं ती सुद्धा वाटेकरु होतेय. अर्थात संस्कृती जतनाची जबाबदारी ही केवळ तीची नाही,हे मान्य. पण व्यसनाच्या विळख्यात अडकून ती स्वत:चही आयुष्य उद्ध्वस्त करतेय. कारण या व्यसनाधिनतेसोबत तिची अधोगती सुरु होते. हेच व्यसन मग तिला लैंगिक स्वैराचाराच्या मार्गावर घेऊन जाते. काही दिवसांपूर्वी एका २०-२१ वर्षांच्या तरुणीची भेट झाली. तिला तिची आई मानसोपचार तज्ज्ञाकडं घेऊन आली होती. तिला ‘वीड’चं व्यसन जडलय. गांजाचं हे गोंडस नामकरण आहे. प्रियकराच्या दबावानं ती यात अडकली आणि पुढे शरीर विक्रयाच्या धंद्यात ओढली गेली. गेल्यावर्षी अमलीपदार्थविरोधी पथकानं एका उदयोन्मुख मॉडेल तरुणीला एमडीसह (मेफेड्रॉन नामक अमलीपदार्थ) अटक केली होती. या झाल्या प्रातिनिधिक स्वरुपातील घटना. त्यांची संख्या दिवसेंदिवस धोकादायकरित्या वाढतेय. गेल्या २० वर्षात व्यसनाधिन स्त्रियांचं प्रमाण जवळपास २० टक्क्यांनी वाढलंय. १०० पैकी २० पुरुष व्यसन करत असतील तर १० स्त्रिया आहेत. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण निम्मे समजायचे. ही त्यांच्यासह संपूर्ण समाजासाठीच धोक्याची घंटा आहे.
अलीकडे आपल्याला मुली रस्त्यावर, कॉलेज कट्ट्यावर मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात सर्रास सिगारेट ओढताना दिसतात. बार असो वा हुक्कापार्लर बिनधास्तपणे मद्यप्राशन करताना अथवा हुक्का पिताना आढळतात. २० वर्षांपूर्वी या देशात हे दृश्य खरंच इतकं सामान्य होतं का? व्यसनाबाबत स्त्रियांची ही वर्तणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात आधी होती का? मग समाजात असा कोणता बदल झालाय ज्यामुळं आज स्त्रिया केवळ सिगारेट, हुक्का आणि मद्यच नव्हेतर गांजा, हेरॉईन, ब्राऊन शुगरसारख्या जीवघेण्या व्यसनाला सुद्धा अगदी सहजपणे बळी पडताना दिसताहेत. नेमकी कुठली कारणं या परिस्थितीला कारणीभूत आहेत. व्यसन करणाºया महिलांमध्ये तरुणी आणि विवाहित तरुणींचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आपल्याला हे चित्र बघायला मिळतंय. फरक केवळ त्यामागील कारणांचा आणि व्यसनाच्या प्रकाराचा आहे. मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांना बरेचदा त्याचे नवरेच दारु प्यायला प्रोत्साहित करतात. श्रमपरिहारासाठी हे आत्मघाती पाऊल उचललं जातं. परंतु व्यसनाचे सर्वाधिक लक्ष्य ठरणाऱ्या तरुणींबाबत मात्र ही कारणे वेगळी आहेत. शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर एकट्या राहणाऱ्या या मुली स्वातंत्र्याचा वापर स्वत:च्या प्रगतीसाठी करण्याऐवजी मौजमस्ती करण्याकडेच त्यांचा कल अधिक असतो. आणि मग स्वकतृत्व सिद्ध करण्याच्या नावावर घराबाहेर पडलेल्या या तरुणी मार्ग भरकटतात.
या मुलींशी संवाद साधताना हे लक्षात येतं की काही वेळेला त्या आव्हान म्हणून व्यसन सुरू करतात. मुलं करु शकतात मग आम्ही का नाही? अशी भावना असते. पुढं हीच चुकीची भावना जीवन उद्ध्वस्त करते. कारण एकदा का व्यसनात अडकलं की त्यातून बाहेर निघणं एवढं सोपं नाही. कुटुंबामधील कमी होत चाललेला संवाद, आईवडिलांचे दुर्लक्ष, लहान वयात मिळणारा पैसा, सामाजिक भीतीची नसलेली पर्वा, पोलीस व कायद्याचे नसलेले भय अशा अनेक गोष्टी मुलींमधील वाढत्या व्यसनाधिनतेला कारणीभूत आहेत. त्यामुळे स्त्रियांमधील वाढत्या व्यसनाधिनतेचा प्रश्न प्राधान्यक्रमावर ठेवावा लागणार आहे. महिलांनीही जागरुक व्हायला हवे.