नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा 

By Balkrishna.parab | Published: October 12, 2017 07:11 PM2017-10-12T19:11:45+5:302017-10-12T19:12:36+5:30

नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Nanded's victory gives the Congress the oxygen and BJP's lesson |  नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा 

 नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा 

संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेडा वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने निर्भेळ यश मिळवले. समोर भाजपा, शिवसेना आणि एमआयएमसारखे प्रतिस्पर्धी असताना अशोक चव्हाणांनी घरच्या मैदानावरचा सामना अगदी एकतर्फी जिंकला. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यात वाढलेली महागाई, जीएसटी, जगभरात खनिज तेलाचे दर घसरले असतानाही पेट्रोल-डिझेलच्या दरांचा उडालेला भडका यामुळे सर्वसामान्यांमध्ये खदखदत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेची निवडणूक भाजपाची परीक्षा घेणारी होती. मात्र या परीक्षेत स्वत: मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते सपशेल अपयशी ठरले. शिवसेनेला फार यश हाती लागले नसले तरी भाजपाचे नुकसान करण्याची त्यांची रणनीती काही प्रमाणात यशस्वी ठरली. तर गेल्या वेळी नांदेडमध्ये 12 जागा जिंकणाऱ्या एमआयएमच्या हाती भोपळा देत धर्माध राजकारणाला थारा नसल्याचे नांदेडकरांनी दाखवून दिले आहे. 
खरंतर नांदेड हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक बालेकिल्ला. अगदी शंकरराव चव्हाणांच्या कारकिर्दीपासून येथील काँग्रेसची तटबंदी भक्कम आहे. अगदी 2014 साली देशभरात घोंगावलेल्या मोदीलाटेत देशभरात दिग्गज काँग्रेस नेते वाहून गेले असताना अशोक चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून येत लोकसभेत पोहोचले होते. त्यामुळे नांदेडची सत्ता राखणे चव्हाणांसाठी कठीण नक्कीच नव्हते. पण भाजपाने फोडाफोडी करून तसेच सर्वस्व पणाला लावून मोठे आव्हान निर्माण केल्याने यंदाची नांदेड महानगरपालिका निवडणूक अशोक चव्हाणांसाठी प्रतिष्ठेची बनली होती.
 गेल्या काही काळात मालेगाव, भिवंडी आणि परभणी या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आणा एक दोन जिल्हा परिषदांचा अपवाद वगळता निवडणुकीच्या मैदानातून प्रदेश काँग्रेससाठी दिलासादायक बातमी आली नव्हती. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र पराभवांची मालिका सुरु असल्याने काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली होती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने नांदेड महानगरपालिकेत विजय मिळवण्याचे आव्हान अशोक चव्हाणांसमोर होते. आणि असोक चव्हाणांनीही हे आव्हान लिलया पेलले. भाजपाकडून झालेली फोडाफोडी, त्यात एमआयएममुळे असलेले मतविभागणीचे आव्हान या सर्वांवर मात करत त्यांनी पालिकेतील 81 जागांपैकी सत्तरहून अधिक जागा काँग्रेसला जिंकून दिल्या. विरोधी भाजपा आणि शिवसेनेचा धुव्वा उडवला. निकालानंतर केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, ही चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया राज्यातील काँग्रेससाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.
त्याबरोबरच या विजयामुळे अशोक चव्हाण यांचे प्रदेश काँग्रेस स्तरावरील नेतृत्वही बळकट झाले आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर टीका करत काही दिवसांपूर्वीच नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र या निकालांमुळे त्यांचा नांदेडचा बालेकिल्ला भक्कम असल्याचेही सिद्ध झाले आहे. तसेच त्यामुळे त्यांच्या उर्वरित पक्षांतर्गत विरोधकांनाही पुढचे काही दिवस शांत राहावे लागणार आहे. 
दुसरीकडे नजर वळेल तिकडे सत्ता मिळवण्यासाठी धावणाऱ्या भाजपासाठी हा निकाल धडा शिकवणारा आहे. राज्यात शेतकऱ्यांचा संप आणि कर्जमाफीपासून सुरू झालेल्या असंतोषाची मालिका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच ग्रामीण भागातील जनतेबरोबरच आता शहरी भागातही वाढत्या महागाईमुळे भाजपाविरोधात असंतोष वाढू लागला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणे भाजपासाठी किमान नांदेडमध्ये तरी महागात पडले आहे. 
नांदेडच्या काँग्रेसच्या बालेकिल्यात मुसंडी मारणे भाजपासाठी तसे कठीणच होते. त्यातच नांदेडमध्ये भाजपाचे संघटनही यथातथाच होते. मात्र असे असतानाही आयात केलेले उमेदवार, आणि शिवसेनेच्या एका आमदारांनी पुरवलेली छुपी रसद यांच्या जोरावर भाजपाचे सेनापती नांदेड सर करण्यासाठी निघाले होते.  त्यामुळे भाजपाचा आजचा पराभव धक्कादायक वगैरे म्हणता येणार नाही. स्वत: मुख्यमंत्री प्रचारात उतरल्यावरही भाजपाला दुहेरी आकडा गाठता आला नाही, हे सुद्धा नामुष्कीजनकच म्हटले पाहिजे. नाही म्हटले तरी गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर भाजपाविरोधात निर्माण झालेले वातावरण आणि प्रत्यक्षात जमिनीवर अनेक समस्यांमुळे निर्माण झालेला असंतोष यामुळे भाजपाच्या नगरसेवकांची संख्या रोडावली. हे भाजपाच्या नेतृत्वाला विचारात घ्यावे लागेल. 
सत्तेस सामील असूनही नेहमीच नाराज राहणाऱ्या शिवसेनेनेही स्वतंत्रपणे लढून भाजपाचे नुकसान करण्याचे धोरण अवलंबवले आहे. नांदेडमध्ये धनुष्यबाणाने कमळाच्या किती पाकळ्या उडवल्या याची सविस्तर आकडेवारी लवकरच समोर येईल. मात्र राज्यातील ठरावीक भाग वगळता अन्यत्र शिवसेना आणि भाजपाला निवडणुका जिंकण्यासाठी नाइलाजाने का होईना एकत्रच लढावे लागणार आहे, हेही यातून दिसत आहे. अन्यथा या दोघांचेही नुकसान अटळ आहे. 
एकुणच नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नांदेडमध्ये पराभव झाला म्हणजे राज्यभरात भाजपाविरोधात वातावरण तयास झाले असे सध्यातरी म्हणता येणार नाही. मात्र तो इशारा आहे. आता त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करायचे की त्याचा गांभीर्याने विचार भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना करावा लागणार आहे. 

Web Title: Nanded's victory gives the Congress the oxygen and BJP's lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.