Valentine Day विशेष -मुलगा, मुलगी बोलली म्हणजे ‘भानगड’च ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:23 IST2020-02-14T14:19:33+5:302020-02-14T14:23:12+5:30
जुन्या काळामध्ये शाळेमध्ये एखादा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तरी डोळे फाडून पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती; परंतु काळ बदलत गेला आणि ही पारंपरिक दृष्टीही बदलत गेली, पण अजूनही ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही.

Valentine Day विशेष -मुलगा, मुलगी बोलली म्हणजे ‘भानगड’च ?
जुन्या काळामध्ये शाळेमध्ये एखादा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तरी डोळे फाडून पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती; परंतु काळ बदलत गेला आणि ही पारंपरिक दृष्टीही बदलत गेली, पण अजूनही ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही.
निखळ मैत्री वगैरे असू शकते याचा फारसा विचार न करता ‘दोघं सारखी एकत्र दिसतात म्हणजे भानगडच’ असणार असे गृहित धरले जाते. शिक्षणाच्या संधी वाढल्या. मुलांबरोबर मुलींही नोकरीसाठी बाहेर पडत आहेत. मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत.
कुठेही शिक्षण घेताना, नोकरी करताना मुला-मुलींचे, सहकाऱ्यांचे विचार जुळतात. एकमेकाला आधार वाटतो. एकमेकाला मदत केली जाते. याचा अर्थ लगेचच त्या दोघांमध्ये काहीतरी भानगडच आहे असा काढणे बरोबर नाही. शिक्षणाने आलेले भान, वास्तवाची जाणीव यातून प्रेम करणारे आणि विचारपूर्वक ते निभावणारेही अनेकजण आहेत.
प्रेमाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून डोक्यात राख घालून अतिरेकीपणा न करता आपले आयुष्य चांगल्या पद्धतीनेही जगणारे अनेकजण आहेत. याचा आदर्श न घेता केवळ तोंडांना रूमाल बांधून गाड्यांवरून फिरणाऱ्यांचीच संख्या वाढणार असेल तर मग या अशाच चर्चा सुरू राहणार. शेवटी ज्यानं, त्यानं ठरवायचं, काय करायचं ते.
- समीर देशपांडे