कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत झाल्या अशाही गंमती-जंमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:51 AM2019-05-29T11:51:27+5:302019-05-29T11:53:31+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी रिंगणात होती. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते तर कोल्हापुरात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांना सांभाळताना व सर्वांना बरोबर घेऊन जाताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातून अनेक गंमती-जंमती झाल्या.

The gamete-money that was held in Lok Sabha elections in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत झाल्या अशाही गंमती-जंमती

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत झाल्या अशाही गंमती-जंमती

Next
ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीत झाल्या अशाही गंमती-जंमतीउमेदवारांची तारेवरची कसरत : व्यक्तिगत राजकीय संघर्षाचीही किनार

विश्र्वास पाटील 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी रिंगणात होती. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते तर कोल्हापुरात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांना सांभाळताना व सर्वांना बरोबर घेऊन जाताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातून अनेक गंमती-जंमती झाल्या.

कोल्हापूर मतदारसंघात धनंजय महाडिक यांना सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचा विरोध होता. आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या उमेदवारी बदलाची थेट मागणी केली होती. त्यांना कागलच्या राजकारणात आपल्याला मदत होईल म्हणून संजय मंडलिक उमेदवार हवे होते; परंतु मंडलिक काही झाले तरी शिवसेना सोडायला तयार नव्हते. बरेच प्रयत्न केल्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांच्या उमेदवारीचा नाद सोडला, परंतु ते शेवटपर्यंत महाडिक यांच्या प्रचारात जीव तोडून सक्रिय झाले नाहीत. त्यामुळे एकूण प्रचारात त्यांनी मोदी यांच्यावरच टीकेची तोफ डागली परंतु संजय मंडलिक यांना पराभूत करा, असे ते कधीही म्हणाले नाहीत.

मुश्रीफ यांच्यासारखीच पंचाईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही झाली. त्यांना धनंजय महाडिक हे उमेदवार हवे होते. त्यासाठी त्यांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत निकराचे प्रयत्न केले; परंतु महाडिक यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंत्री पाटील यांची अडचण झाली. त्यांनीही ऐन निवडणूक मध्यावर आली असतानाही महाडिक हे उमेदवार म्हणून उजवे असल्याचे विधान केले. त्याशिवाय त्यांनी प्रचार काळात महाडिक यांचा पराभव करा, असे म्हणण्याचे धाडस केले नाही.

कोल्हापूर उत्तरमध्ये संजय मंडलिक यांची आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार व भाजपचे महेश जाधव यांना सांभाळताना तारेवरची कसरत झाली म्हणून त्यांनी संजय पवार व विजय देवणे यांची मदत जिल्ह्यांतील प्रचार यंत्रणेसाठी घेतली. मंडलिक यांच्याकडून सुनील मोदी व जनसंपर्क अधिकारी सतीश पाटील हे रोज सकाळी लवकर आमदार क्षीरसागर यांच्या घरी जात. त्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे व त्यानुसार दुरूस्त्या करतो म्हणून सांगायचे. ते नाराज होणार नाहीत याची काळजी घेताना दमछाक झाली.

वृत्तपत्रांत प्रचाराच्या बातम्या प्रसिद्धीसाठी देण्यावरूनही रूसवे-फुगवे सहन करावे लागायचे. बातमी मोठी, फोटो लहान,किंवा बातमी डाव्या बाजूला आली,यावरूनही रुसवे - फुगवे झाल्याचा त्रास मंडलिकांना सहन करावा लागला. कोल्हापूर उत्तरमध्येच हा सासूरवास जास्त राहिला. त्यास क्षीरसागर-पवार किंवा क्षीरसागर-भाजप यांच्यातील संघर्षाची किनार होती.

तुलनेत करवीर, राधानगरी मतदारसंघांत शिवसेनेची प्रचार यंत्रणा एकमार्गी राबली तसेच चंदगडमध्येही झाले. कागलमध्ये गैबी चौकात सभा व्हावी, असा प्रयत्न भाजपकडून बराच झाला परंतु तशी सभा झाली आणि समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकेचे आसूड ओढले तर मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते नाराज होतील, अशी भीती मंडलिक यांना होती त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत ही सभाच तिथे होऊ दिली नाही.

मुश्रीफ हे संजय मंडलिक यांचे नावच प्रचारात घेत नसल्याचे लक्षात आल्यावर राष्ट्रवादीने मुद्दाम शरद पवार यांचीच सभा कागलच्या गैबी चौकात घ्यायला लावली. त्या सभेत मुश्रीफ भावनिक झाले परंतु तिथेही त्यांना मंडलिक यांचा विसरच पडला. या सगळ्याचा परिणाम म्हणून कागलमध्ये महाडिक यांच्याविरोधात तिन्ही गट ताकदीने कामास लागले व मताधिक्क्याचा डोंगर उभा राहिला. माजी आमदार विनय कोरे यांचीही दोन्ही मतदारसंघातील भूमिका नरो वा कुंजरो अशीच राहिली. सावकर यांनी कुणाचे काम करा व कुणाला कामाला लावा हे शेवटपर्यंत सांगितले नाही.

महाडिक यांना तर जास्तच त्रास

राष्ट्रवादीमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. कारण तिथे भेटेल तो कार्यकर्ता महाडिक यांनी आपल्याला कसा त्रास दिला हेच सांगायचा. त्यामुळे एकूण प्रचारातील निम्म्याहून जास्त वेळ राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची (दाढ्या करण्यात अशी मिश्कील टिप्पणी) समजूत काढण्यात गेला. मुळात प्रचारात सक्रिय होण्यातच त्यामुळे उशीर झाला. ही नाराजी कमी होती की काय तोपर्यंत आमच्या मतदारसंघात महिला मेळावे तुम्ही का घेतले, अशीही विचारणा काँग्रेस नेत्यांनी केली.

महाडिक यांच्यासाठी एकूण प्रचार काळात एक दिवस असा गेला नाही की त्यांच्यासाठी त्यादिवशी काहीतरी चांगली गोष्ट घडली आहे. महापालिका राजकारणात प्रा. जयंत पाटील यांच्यात व सत्यजित कदम व सुनील कदम यांच्यात अजिबातच सख्य नाही. त्यामुळे कदम बंधूंना बावडा व कदमवाडी परिसरातील ८ प्रभागांची जबाबदारी देण्यात आली. पाटील-कदम यांनी स्वतंत्रपणे प्रचार केला.

अहो, माझे काय..?

एका माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केलेली मागणी पूर्ण झाली. दिलेले पैसे त्यांनी तिजोरीत ठेवले नसतील तोपर्यंत त्यांच्या जावयांचा फोन आला. अहो, सगळे राजकारण आता मीच पाहतोय, तुम्ही माझा काय विचार करणार आहे की नाही..? संबंधित माजी आमदारांनी मदत तर घेतलीच परंतु त्यांचे कार्यकर्ते अगोदरच धनुष्यबाण घेऊन पसार झाले होते.
 

 

 

Web Title: The gamete-money that was held in Lok Sabha elections in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.