corona virus -कोरोना म्हणतो, मी पुन्हा येईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 20:08 IST2020-04-06T19:21:21+5:302020-04-06T20:08:30+5:30
कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. बातम्या ऐका किंवा वाचा कोरोनाने सारा प्राईम टाईम, डे टाईम, नाईट टाईम व्यापला आहे. तो सर्वत्र व्यापला असताना मला भेटला.

corona virus -कोरोना म्हणतो, मी पुन्हा येईन
कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. बातम्या ऐका किंवा वाचा कोरोनाने सारा प्राईम टाईम, डे टाईम, नाईट टाईम व्यापला आहे. तो सर्वत्र व्यापला असताना मला भेटला. तो का आला ते ही सांगीतले आणि माणूस जर सुधारला नाही तर पुन्हा येईन म्हणायला लागला. तो एकटाच बोलत होता. आपल्या चुकांचा पाढा वाचत होता. तो काय म्हटला हे त्याच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवावे वाटले तेच येथे प्रसिद्ध करत आहे
कुणकुण लागेपर्यंत, बातमी आली
बातमी वाचेपर्यंत,साथ झाली
कोण एक व्हायरस, कोरोना न दिसणारा
चेंडूसारखा गोलमटोल, अंगावर काटे
रंग गुलाबी, पण प्रेमाचा नव्हे
तिरस्काराचा धनी बनलेला
सकाळ असो, वा संध्याकाळ
देहात नाही पण, मनात वसलेला
देश धर्म जात, पंथ सारी बंधने विसरलेला
एकमेवाद्वितीय
सर्व चॅनेल्स आणि वृत्तपत्रे व्यापलेला उपद्व्यापी बनलेला
कोरोना
काल मला भेटला,मन मोकळं करत
भरभरून बोलू लागला
घाबरलास मला, भितोस मला
काय केलं मी, का घाबरतोस मला
तुलाही माझं वागणं चूकीचे वाटतय
मी चुकतोय असंच तुलाही वाटतय
ही तर तुमच्याच, कर्माची फळ भोगताय तुम्ही
मला का दोष देताय चुकलाय तर तुम्ही
आठव. अगदी सुरूवातीपासून
डार्विननच सांगीतलयं ना, उत्क्रांती कशी झाली
आठव अगदी तिथंपासून
पृथ्वीवर सजीव अवतरला तोच अपघातातून
आमच्यासारख्या, अनंत रचना बनल्या पाण्यात
त्यातीलच एका रचनेत जीव आला
अमिबासारखा एकपेशीय
तो वाढला उत्क्रांत पावला
पुढे पाण्यातच
शैवाल जलवनस्पती
पुढे पाण्याबाहेरही वनस्पती मग जलचर
उभयचर भूचर.. प्राणी आणि पक्षी
त्यातलाच एक प्राणी तुम्ही वानर.
वानरापासूनच माणूस घडला
हे सारं मी नाही डार्विन म्हणाला
चार पायावरचे चालणे सोडून
तू दोन पायावर उभा राहिलास
वानराचा म्हणे नर झाला
तुझे डोक जमिनीपासून गेले दूर
तिथेच तू आमच्यापासून दुरावलास
स्वत:ला विश्वाचा स्वामी समजलास
स्वचा शिरकाव तुझ्यात झाला, स्वत:पुरते पाहू लागलास
सगळं काही ओरबडू लागलास स्वत:साठी
गरज नसतानाही कारण
तुझ्या डोक्यात केवळ तूच राहिलास
मातीपासून दूर गेलेल्या डोक्यात
स्थिरावली अनिती मी, माझे मीपण
आणि डोक्यात केवळ स्वार्थ
हरवलेस यात तुझे प्राणीपण
तुला हवे होते सुख
त्यासाठी लागलास गटाने राहायला
स्थिर प्रथम झाडावर मग गुहेत
आणि नंतर नदीकाठी घरे बांधून
या स्थिरतेन तू आणखी स्वार्थी झालास
लाथाडले निसर्गनियम
आणि लादलेस तुझे नियम
गरजेइतकेच घ्यावे हा विसरलास मूलमंत्र
आणि बनलास धनी
काम, क्रोध, मद, मोह, मत्सरादि षडरिपूंचा
हवे ते ओरबडत अखेर
तू मानवही न राहता दानव झालास
नद्या
ज्यांनी तुला साथ दिली
नगरे वसवायला शेती करायला
जीवनदायीनी बनली
तिच्याकडून घेतलेस पाणी
पिण्यासाठी स्वच्छतेसाठी शेतीसाठी
आणि तुझ्या सुखासाठी
यंत्रे बनवणाऱ्या कारखान्यासाठी उद्योगांसाठी
घेणारा म्हणून तू घेत राहिलास
घेणाऱ्याचे हात घ्यायला मात्र तू विसरलास
तूही दिलेसना नदीला
दिलेस प्रदूषण शहरातील घाणपाणी
कारखान्यांचे रसायनमिश्रीत पाणी..
चामडी कमावून सोडलेलङ्घ कागद बनवताना वापरलेल
शेतातील जास्त वापरलेल्या खतांच अन किटकनाशकांच ओझं
वाहणारं पावसाचं पाणी
ही सारी घाण मिसळून
तू बनवले तिलाच मृत्यूदायीनी
तूला अन्य जीवांचे तरी मोल कोठे
तोडलीस वने मारलेस प्राणी
सगळीकडे तुझीच मनमानी..
निसर्गाचा नियम मोडतच राहिलास
सुखाच्या कल्पना वाढवत राहिलास
तू नेहमी म्हणयचास आम्ही केली प्रगती
तुला कळलेच नव्हते हीच खरी अधोगती
पैसा हवा सुख हवे त्याच्याही व्याख्या बदलत राहिलास
अनेक जाती नष्ट करत गेलास
तुझ्यातील
प्राणीपण तर कधीच गेले होते
माणूसपणही सोडू लागलास
धर्म, जात.. पंथाच्या भिंती उभारल्यास..
पोकळ अस्मिता निर्माण करून
माणसातील गरीबांना विकू लागलास
त्यांनाही तू झुंजवू लागलास
कोंबड्यांच्या झुंजी बैलांच्या शर्यती
घोड्यांच्या अन् गाढवांच्याही शर्यती
या कमी होत्या म्हणून
लढाया आणि चढायात गुंतलास
साम्राज्य उभारलीस दुर्बलांना लुटत राहिलास
लुटत राहिलासङ्घ धन धान्य.. अन अगदी शीलही
प्राण्याना नावे ठेवू लागलास पण ते नियम पाळतात
हे तू विसरलास
तू मात्र तुझेच नियम मोडत राहिलास
तू वागत राहिलास अनिर्बंध
जेत्यासारखा
मीच सर्वश्रेष्ठ करायचे होते सिद्ध
स्वत:ला विश्वाच्या केंद्रस्थानी मानत राहिलास
पण हक्क घेताना जबाबदारी विसरलास
काही घेतले तर दिले पाहिजेङ्घ हेच विसरलासङ्घ
इतर सजीवांचा तर होतासच
पण तूच तुझा वैरी बनलास
इतरांना झुकवण्यासाठी अनेक युद्धे केलीस
युद्धात जिंकत नाही म्हणून दहशतवाद आणला
सगळ्यामागे काय होते रे स्वार्थ मीपण..
याव्यतिरिक्त.
पण तू ते वाढवलेस
स्वत:चे घर यात पेटले तरी
तूझे उघडले नाहीत डोळे जपत राहिलास व्रत गांधारीचे
दृष्टी असूनही नाही स्वीकारलास डोळसपणा
तू सत्य मानलास निसर्गाला जिंकल्याचा भास
अनेक जीव संपवले
प्रजाती नष्ट केल्याङ्घ वनस्पती संपवल्या
चिमण्या कावळेही तुझे भक्ष्य बनवलेस
नाही सोडले तू अगदी खवल्या मांजर अन घुशीलाही
अनिर्बंध वागलास
पाण्यापासून दाण्यापर्यंत
सर्वत्र सत्ता राबवत राहिलास
तुझी संख्या वाढवताना इतर जीवांचे दिलेस मोल
तुला हक्क नसताना निसर्गाचा नियम मोडून
जंगले संपवली प्राणी संपवलेस
पाणीही संपवलेस
निसर्गानं तुला अनेकदा समजावले
कधी भूकंप कधी अवर्षण
कधी अतिवृष्टीच्या रूपात येवून
पण
यातून तू सावरत राहिलास
म्हणून पुन्हा पाठवले
कधी प्लेगच्या तर कधी मलेरियाच्या रूपात
कधी देवीच्या कुष्ठरोगाच्या..
कधी एडस तर कधी सार्स इबोनाच्या रूपात
त्यावर तू औषधे शोधलीस
तू पुढे जात रहिलास
पुन्हा निसर्गाची हानी करत
विरोध करणाऱ्यांना संपवत
मग तो गॅलिलिओ असो किंवा ग्रेटा
सत्य सांगणाऱ्याना वेडे ठरवत
तूला पुन्हा शिकवायला हवा होता धडा
म्हणूनच मला पाठवलय
आता मात्र तू घाबरलास.
स्वत:च्या दिसण्याचा गर्व तूला
तोंड झाकून फिरायला लागलास
माझ्या येण्यान
विमान सोडलस गाड्या बंद केल्यास
पायी फिरायलाही घाबरतोस
एसी बंद कारखाने बंद
कोणीही आंदोलन न करता सारे बंद
प्रत्येकाच्या देहात शिरला नसलो तरी
मनात मी शिरलो आहे
माझ्या भितीने तुझे विश्व व्यापले आहे
विश्वाचा मालक व्हायच होत तूला
आज गल्लीतही भितोस फिरायला
मी गाठेन ही एकच मनात भिती
किती जगले किती मेले पहात जाती राती
माझ्या भितीन का होईना तू सगळ थांबवलस..
कुठं महिना तर कुठे पंधरा दिवस
कार्बन उत्सर्जन थांबलय
थांबलेल निसर्गचक्र मात्र सुरू झालय
शंभर वर्षानंतर
पक्षांनी सुटकेचा घेतलाय श्वास
ओझोन पातळी लागू लागली ठिगळं
ज्यांना जगायच त्यांना रान झाल मोकळं
जाता जाता एक आठवला तुझाच नियम
तूच बनवलेला गुन्हेगारांच तुम्ही तोंड झाकता
आज तुम्ही सर्वानी तोंड झाकलय
तुम्ही गुन्हा केलाय तुम्हाला तोंड दाखवायची लाज वाटते म्हणून
माणूस गुन्हेगार आहे म्हणून
म्हणून म्हणतोय.
आता तरी सुधार.. स्वार्थाला आवर
पृथ्वी एकट्याची नाही सर्वांची आहे
आता तरी हे सत्य स्वीकार.
निसर्ग टिकू दे
तूझ्यामुळं बिघडणार निसर्ग चक्र सावर
एक विचारू नकोस मी कोणामुळे आलोय
निसर्गाने दिलेला झटका.
की
तुमच्यापैकी कोणाची चूक
जबाबदार कोणीही असलं तरी मूळाशी तुझा स्वार्थ आहे..
नाहीतर डायनॉसॉर संपला तसं
तूला संपवायच सामर्थ्य निसर्गात आहे
कदाचित तू मलाही संपवशील
पण मी नवे रूप घेईन आणि
तू सुधारला नाहीस तर
लक्षात ठेव.
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
- डॉ. व्ही. एन. शिंदे,
उपकुलचिव, शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर